पुणे : अपर पोलिस आयुक्तांच्या बदनामीचा कट उघडकीस | पुढारी

पुणे : अपर पोलिस आयुक्तांच्या बदनामीचा कट उघडकीस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर पोलिस दलातील एका तत्कालीन अपर पोलिस आयुक्तांच्या बदनामीचे कटकारस्थान उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रार अर्जावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला उपनिरीक्षक यांच्या सह्या करण्यात आल्या होत्या. अपर पोलिस आयुक्तांची बदली होण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. चौकशीअंती सह्या खोट्या असल्याचे तसेच संबंधित अधिकार्‍यांनी अशा तक्रारीच केल्या नसल्याचे उघड झाले.

याप्रकरणी अपर पोलिस आयुक्तांचे वाचक (रीडर) पोलिस उपनिरीक्षक तुकाराम नाळे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 3 ऑक्टोबर रोजी घडला आहे. संबंधित अपर पोलिस आयुक्त हे पुणे शहर पोलिस दलात पूर्व प्रादेशिक विभागाचे कामकाज पाहत होते. त्यांची नुकतीच बदली झाली आहे. ते पदावर काम करीत असताना त्यांची बदली व्हावी म्हणून त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर असलेली तसेच तक्रारी असलेली पत्रे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक यांना पाठविण्यात आली होती.

ही पत्रे शहर पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि महिला उपनिरीक्षक यांच्या नावाने पाठविण्यात आली होती. यावर त्यांच्या सह्या करण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या अधिकार्‍यांच्या नावे सह्या करून ही पत्रे तयार करण्यात आली होती, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी असे काहीच केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा बदनामीचा बनाव असल्याचे तपासातून पुढे आले. यानंतर गुरुवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button