कुसगाव टोलनाक्याजवळ लवकरच ट्रॉमा केअर सेन्टर

कुसगाव टोलनाक्याजवळ लवकरच ट्रॉमा केअर सेन्टर
Published on
Updated on

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा :  एक्सप्रेस हायवे आणि राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा बोर घाट आणि लोणावळा परिसरात सातत्याने होणार्‍या अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील वलवण गावातील कुसगाव टोलनाक्याजवळ ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरच हे सेंटर प्रत्यक्षात सुरू होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी अचानक लोणावळा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाला भेट दिली. त्या वेळी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी कुसगाव टोलनाक्यावर ट्रामा सेंटर बांधणे आणि लोणावळा नगर परिषदेच्या परिक्षेत्रातून जाणार्‍या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यासंदर्भातील निवेदन चव्हाण यांना दिले. त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याशी तत्काळ दूरध्वनीवर संपर्क साधून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वरील माहिती दिली. या वेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, भाजपचे लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, माजी नगरसेवक सुशील सैंदाने, अमित गंधे, सुनील तावरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीतून जाणार्‍या यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर अर्थात एक्सप्रेस हायवेवर कुसगाव टोलनाक्याजवळ सुमारे 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आणि 25000 चौरस फूट क्षेत्र असणारी वाणिज्य वापराची इमारत बांधल्यापासून न वापरता धूळ खात पडून आहे. एक्सप्रेस हायवेवर तसेच राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि त्यापार्श्वभूमीवर अत्यंत आवश्यक असलेल्या वैद्यकीय सुविधांची निकड लक्षात घेऊन या इमारतीत ट्रामा केअर सेन्टर सुरू करावे, अशी मागणी घेऊन माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी हे मागील अनेक काळापासून पाठपुरावा करीत आहेत. त्या मागणीला आता यश येताना दिसत आहे.

लोणावळा शहरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन, लोणावळा नगर परिषदेच्या परिक्षेत्रातून जाणार्‍या मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरण करणे, महामार्गाचे दुतर्फा सार्वजनिक गटार व्यवस्था उपलब्ध करणे आणि ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदनदेखील या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांना देण्यात आले. या मागणीसंदर्भातदेखील दखल घेऊन त्यावर लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले.

स्वच्छतागृह सुरू करण्याचे आदेश

एकवीरा देवी गड पायथ्याला असलेले स्वच्छतागृह तत्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत. वेहरगाव येथील एकवीरा देवी गड पायथ्याला असलेले स्वच्छतागृह मागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, अशी तक्रार मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेत हे स्वच्छतागृह तत्काळ सुरू करण्याचे आदेश मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news