

मंचर ( ता. आंबेगाव): पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींपैकी 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना रंगत आली आहे. निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सध्या प्रत्येक वॉर्डवाईज जेवणावळीला ऊत आला आहे. हॉटेल व्यावसायिकांनासुद्धा ऐन मार्गशीष महिन्यात सुगीचे दिवस आले आहेत.
मार्गशीष महिन्यात हिंदू धर्मात मांसाहार वर्ज आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार चालू असल्याने मांसाहार पार्ट्यांना जोर धरू लागला आहे. बहुतेक ठिकाणी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खुश करण्यासाठी मांसाहारी तसेच शाकाहारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढतीचा सामना आहे.
तालुक्यातील 16 गावांमध्ये दोन ते तीन पॅनेल तयार झाले आहेत. या पॅनेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खुश करण्यासाठी बहुतेक ठिकाणी मांसाहारी तसेच काही ठिकाणी शाकाहारी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. बहुतांश जण कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ढाब्यांवर जेवण्यासाठी घेऊन जात आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना ऐन मार्गशीष महिन्यात सुगीचे दिवस आले आहे.
ऐन थंडीत मतदारांना खुश करण्यासाठी मांसाहारी पार्टीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बहुतांश ठिकाणी चिकन स्वस्त असल्याने चिकनच्या तसेच मच्छींच्या पार्ट्यांना ऊत आला आहे. काही ठिकाणी प्रचारासाठी बरोबर फिरणार्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मटण पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे.
सोशल मीडियाद्वारे प्रचाराला वेग
सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेट्सद्वारे उमेदवारांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर रंगत चढली आहे. वाडी-वस्तीवर घोंगडी बैठकांना जोर आला आहे. उमेदवारांनी बॅनरद्वारे आणि डिजिटल गाणी बनवून गाडीद्वारे प्रचार सुरू केला आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन परिपत्रक आणि स्टिकर चिटकून प्रचाराला सुरूवात केली आहे.
गावकी-भावकी जपण्याचा मंत्र
कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा गवगवा करून प्रचारासाठी घरोघर जाऊन मोठ्या शक्ती प्रदर्शनांसह मतदारांना आपले चिन्ह पटवून देत आहेत. मतदारांना जेवणाचे आमिष दाखवून खुश करण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामपंचायत पातळीवर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने गावकी व भावकीत निवडणुकीमुळे कायमस्वरूपी वाद पडण्याची शक्यता जास्त असते. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जास्त करून गावकी आणि भावकीतच चालू आहे.
तालुक्यात 151 जागांसाठी 259 उमेदवार
सदस्यपदाच्या 76 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत 151 जागांसाठी 259 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत एकूण मतदार केंद्रांची संख्या 61 असणार असून त्यात महिला मतदार 20 हजार 723, पुरुष मतदार 21 हजार 528 असे एकूण मतदार 42 हजार 251 आहेत. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत होणार असुन मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.