

भवानीनगर (ता इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : थोरातवाडी (ता इंदापूर) येथील ओढ्यावरील पुलाचा भराव अडीच वर्षांपूर्वी पावसाळ्यात आलेल्या पुरामध्ये वाहून गेला असून या पुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. लासुर्णे, बेलवाडी, थोरातवाडी, घोलपवाडी, उदमाईवाडीपासून ते तावशीपर्यंतच्या ग्रामस्थांना लासुर्णे ते तावशी या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. थोरातवाडी येथील पुलाचा दोन्ही बाजूचा भरावा मागील अडीच वर्षांपूर्वी आलेल्या पावसाळ्यातील पुरामध्ये वाहून गेल्याने मोठ्या वाहनांना तसेच मालवाहतूक करणार्या वाहनांना या रस्त्यावरून ये – जा करताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. भरतीची वाहने पलटी होण्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. पावसाळ्यात दुचाकी गाड्यांना घसरून अपघात झाले आहेत. या
पुलाचे काम मागील अडीच वर्षापासून प्रतीक्षेत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केलेले आहे. इंदापूरवरून सातारा जिल्ह्यात जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असूनदेखील या पुलाचे काम करण्यात झालेले नाही. या पुलाच्या कामाचे दोन वेळा टेंडर झालेले असून पुलाचे काम होत नसल्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या पुलाचे काम तातडीने होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे मागणी करणार असल्याचे अर्बन बँकेचे संचालक लालासाहेब सपकळ यांनी सांगितले. या वेळी पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूराव खरात व येथील ग्रामस्थ उपस्थित होते.