पुणे : वेतन कपातीमधील पैसे विश्रामगृहासाठी; जि.प.चा निर्णय | पुढारी

पुणे : वेतन कपातीमधील पैसे विश्रामगृहासाठी; जि.प.चा निर्णय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी मार्केट यार्ड येथील मोकळ्या जागेत विश्रामगृह बांधण्यासाठी 66 लाख 30 हजार 601 रुपये वर्ग केले आहेत. हे पैसे कोरोना काळात जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्‍यांचे सन 2020 मधील जुलै महिन्यातील एक दिवसाचे वेतन कपात केले होते, त्यामधील शिल्लक रक्कम ही विश्रामगृहासाठी देण्यात आली आहे. यासाठी कर्मचारी संघटनेने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अहवालातून समोर आली आहे.

जिल्हा परिषदेने एक दिवसाचे वेतन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे स्वतंत्र लेखाशीर्षाखाली जमा केले. त्यामधून दोन कोटी 43 लाख 49 हजार 595 एवढा निधी उभा राहिला. त्यापैकी कोरोनाच्या अनुषंगाने 50 टक्के रक्कम कर्मचार्‍यांच्या कोरोना व इतर आकस्मिक वैद्यकीय उपचारांसाठी दोन लाखांपर्यंत मदत करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला.

त्यापैकी आतापर्यंत एक कोटी 73 लाख 18 हजार 994 रुपये निधी खर्च झाला. त्यामध्ये शरद भोजन योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, कोरोना केंद्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे मानधन, जिल्हा परिषदेकडील विविध लेखाविषयक व इतर योजनांची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरा आणि इतर कारणांसाठी एक कोटी 11 लाख 79 हजार 763 रुपये खर्च करण्यात आले.

तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कोरोना व इतर आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी 55 लाख 89 हजार 231 रुपये खर्च झाला. याशिवाय जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी घेतलेल्या शिबिरासाठी साडेपाच लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत, असा एकूण एक कोटी 73 लाख 18 हजार 994 रुपये खर्च करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद सेवेत नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेसाठी चार लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Back to top button