रांजणगाव परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

रांजणगाव परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

रांजणगाव गणपती (ता. शिरुर); पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती एमआयडीसी परिसरापासून ते गावांच्या वेशीपर्यंत सर्वत्र जुगार- मटका, गावठी दारूविक्री असे अवैध धंदे जोमात सुरू आहेत. मात्र, पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये येत नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बदलाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अवैध धंद्यांवर कारवाईऐवजी पोलिस प्रशासन 'हप्ता वसुलीत' मग्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी याप्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अशातच गुन्हेगारी व औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता शासनाने शिरुर उपविभागीय पोलिस अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. पोलिसांना अनेक वेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबतच्या तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनाही अवैध धंदे सु रू असल्याचे सापडले आहेत, मात्र कारवाई होत नाही.

अवैध धंद्यांमध्ये मटका, जुगार, हातभट्टी दारूविक्री, गुटखा विक्रीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सामान्य नागरिकांनी तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतच हॉटेल व्यावसायिक विनापरवाना मद्यविक्री करत आहेत. अशा ठिकाणी कर्मचार्‍यांपासून ते वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत प्रत्येकाचे वेगळे हप्ते वसूल होतात का? असाही प्रश्न विचारला जात आहे. परिसरातील पोलिस पाटलांकडून तरी तक्रारींचा अहवाल पोलिसांना प्राप्त होतो का असाही सवाल उपस्थित होत आहे. अवैध धंद्यावर पोलिस प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस ठाण्याच्या जवळच दारू प्राशन
पोलिस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर असणार्‍या वाईन्स शॉपीतून तळीराम बाहेर पडतात आणि थेट ठाण्याच्या रस्तादुभाजकावर खुलेआम मद्य प्राशन करताना दिसतात. परिसरातील छोट्या ठेल्यांवर तसेच हॉटेलमध्येही खुलेआम दारू विक्री सुरू आहे. अनेक वेळा कारवाईही होते, मात्र पुन्हा धंदे सुरू होऊन पोलिसांना आव्हानच दिले जात असल्याचे समोर येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news