ई-लर्निंग शाळेची घंटा वाजणार कधी? सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा सवाल | पुढारी

ई-लर्निंग शाळेची घंटा वाजणार कधी? सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा सवाल

मिलिंद पानसरे

धायरी : सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूलच्या इमारतीचे काम वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे. ही इमारत गेल्या 18 फेब्रुवारी रोजी महापालिका भवन रचना विभागाने शिक्षण मंडळाच्या ताब्यात दिली आहे. त्यानंतर अकरा महिने झाले, तरी या इमारतीत शाळेची पहिली घंटा अजून वाजलीच नाही. त्यामुळे परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

सिंहगड रोड परिरारातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने टेलिफोन एक्स्चेंजजवळ ही शाळा बांधली आहे. या इमारतीसाठी सहा कोटी 80 लाख 13 हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याची सुत्रांनी सांगितले. मात्र, या इमारतीत अद्याप शाळा सुरू करण्यात न आल्यामुळे ती धुळखात पडली आहे. यामुळे महापालिका प्रशासन व शिक्षण मंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या इमारतीत प्रशासनाने शाळा सुरू करण्याऐवजी महापालिकेचा छपाई कारखाना तळमजल्यावर सुरू केला. या विरोधात परिसरातील नागरिकांनी संतप्त व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासनाने या इमारतीत लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, वडगाव बुद्रुक येथील 203 बी ही इंग्रजी माध्यमाची शाळा या इमारतीत भरवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ही शाळा सुरू होणार कधी, असा सवाल नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालक उपस्थित करू लागले.बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे म्हणाले की, या इमारतीत येणार्‍या शैक्षणिक वर्षात ई-लर्निंग स्कुल सुरू करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

महापालिका भवन रचना विभागाकडून वडगाव बुद्रुक येथील ई-लर्निंग शाळेच्या इमारतीची सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. खेळाचे मैदान विकसित करण्याचे काम ही पूर्ण करण्यात आले आहे. भवन रचना विभागाकडून शिक्षण मंडळाच्या ताब्यात ही इमारत देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही शिक्षण मंडळाने करावी.

                                                                    -रामदास कडू,
                                                 शाखा अभियंता, भवन रचना विभाग

या इमारतीसमोर असलेले खेळाचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. तसेच विजेची काही कामे बाकी आहेत. ही कामे झाल्यानंतर लगेच या इमारतीत शाळा सुरू करण्यात येणार आहे.
                                                                  -विजय आवारी,
                                                               सहाय्यक शिक्षण प्रमुख

परिसरातील सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळेची ही इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी चांगले व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी महापालिकेने या ठिकाणी लवकरात लवकर शाळा सुरू करावी.
                                                                  -श्रीकांत जगताप,
                                                                   माजी नगरसेवक

Back to top button