पुणे: बाईक टॅक्सी बंदसाठी आता बाबा आढावांची रिक्षा संघटना मैदानात | पुढारी

पुणे: बाईक टॅक्सी बंदसाठी आता बाबा आढावांची रिक्षा संघटना मैदानात

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेकायदा रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडत आहे. त्यामुळे शहरातील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी 16 संघटनांनी मिळून बेमुदत संप पुकारला होता. मात्र, पदाधिकार्‍यांना अटक झाल्यामुळे हा संप फसला. परंतु, आता रिक्षाचालकांच्या हक्कासाठी कामगार नेते बाबा आढावांची रिक्षा पंचायत ही रिक्षा संघटना मैदानात उतरली आहे. बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी आता बाबा आढाव धनुष्य उचलणार असून, या आंदोलनासंदर्भातील संघटनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे.

बेकायदा टॅक्सी बाईक चालवणार्‍या रॅपिडो कंपनी व त्यांच्या संचालकांविषयी प्रशासन आणि पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत? परिणामी, रिक्षाचालकांचा व्यवसाय बुडत आहे. बेकायदा टॅक्सी बाईक चालवणार्‍या रॅपीडो कंपनीवर फसवणूक, सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे. त्यासाठी पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने गुरूवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र 2, पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस ठाणे यांना भेटून निवेदने दिली आहेत.

Back to top button