टेम्पो-मोपेड धडकेत एक जण ठार, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना | पुढारी

टेम्पो-मोपेड धडकेत एक जण ठार, पुणे-नाशिक महामार्गावरील घटना

नारायणगाव(पुणे), पुढारी वृतसेवा: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव-वारूळवाडीला जोडणाऱ्या मुख्य पुलावर मोपेड व मेक्सिमो टेम्पो यांच्यात धडक होऊन मोपेड चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मनीष भालभद्र मेहता (वय ४३, रा. कुबेर आंगण, कोल्हे मळा, नारायणगाव) असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबतची फिर्याद निलेश हनुमंत जेजुरकर (रा. शेटे मळा, नारायणगाव) यांनी दिली असून पोलिसांनी टेम्पो चालक विक्रम शंकर मोडवे (वरय ३३, रा. येडगाव) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मनीष मेहता हे वारूळवाडीकडून नारायणगावकडे त्यांच्या मोपेड गाडीने (एमएच १४ जेक्यू २७९५) येत होते. या वेळी औषध वाहतूक करणारा छोटा मेक्सिमो टेम्पो (एमएच १४ जीडी ५४७१) हा नारायणगावहून वारूळवाडीकडे चालला होता. या दोन्ही गाड्या मीना नदी पुलावर आले असता दोघांमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की मनीष यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

Back to top button