कामशेत : प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे ; पीएमपीएल बसचालकांचा हलगर्जीपणा

कामशेत : प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे ; पीएमपीएल बसचालकांचा हलगर्जीपणा

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : मावळमध्ये धावणार्‍या पीएमपीएमएल बसचे चालक मोबाईलवर तासन्तास बोलत असल्यामुळे बसमधील प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. अनेक प्रवाशांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पीएमपीएमएलच्या बसचालकांची अरेरावी, वाहकांची तिकीट देताना, बसमध्ये चढताना व उतरतानाची अरेरावी हे प्रकार मावळ तालुक्यातील रहिवाश्यांना काही नवीन नाही. याबद्दल नेहमीच तक्रार मावळ तालुक्यातील नागरिक करीत असतात. परंतु आता पीएमपीएमएलचे बस चालक चक्क बस चालवताना मोबाईल फोनचा वापर करतानाचे छायाचित्र मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद झाले आहे.

हा प्रकार तळेगाव दाभाडे सोडून पुढे आल्यावर वडगांव मावळच्या हद्दीतून कामशेतकडे जाताना सर्रास पाहायला मिळतो. पीएमपीएमएलच्या बसचालकांवर कोणाचाच वचक राहिला नसल्याचे चित्र सध्या मावळ तालुक्यात दिसत आहे.  या छायाचित्रांमध्ये बसचालक चक्क गाडी बाजूला थांबवून एका टपरीवाल्याशी काहीतरी बोलतानाचे छायाचित्र आढळून येत आहे. या अशा प्रकारांमुळे अपघाताची शक्यता तर नाकारता येत नाहीच. परंतु प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे अशा अरेरावी करणार्‍या बसचालकांवर निलंबनाची कारवाई होणार का, असा प्रश्न मावळ तालुक्यातील नागरिक विचारीत आहेत.

यांच्यावर कारवाई का नाही…
बस चालवताना मोबाईलवर रिल्स बघणे, मोबाईलवर बर्‍याच वेळ बोलणे यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही; परंतु यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न मावळ तालुक्यातील नागरिकांनी विचारला आहे.

आज निगडी लोणावळामध्ये प्रवास करताना अत्यंत वाईट अनुभव आला. चालक अंधाधुंद गाडी चालवत होता. स्टॉप आला तरी गाडी पुढे नेत होता. त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागला. एवढं कमी होत की काय त्याने विमल घ्यायला गाडी थांबवली, हे कायद्यात बसतं का? ऑन ड्युटी नशा ? एवढ्या वरही हा चालक फोनवर बोलत गाडी चालवत होता. हद्द झाली बापाचा रोड समजून गाड्या चालवायच्या, प्रवाशांचा जीव म्हणजे खेळणं आहे का?
                                                                       -अजय फावडे, बस प्रवासी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news