पिंपरी : झाडे तोडण्याऱ्यावर फौजदारी दाखल करा ; नागरिकांची मागणी

पिंपरी : झाडे तोडण्याऱ्यावर फौजदारी दाखल करा ; नागरिकांची मागणी
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड शहरात झाडांची कत्तल खुलेआम सुरू आहे. बांधकामास अडथळा होतो, धोकादायक असल्याने तसेच, जाहिरात होर्डिंग दिसत नसल्याने, कचरा होतो आदी विविध कारणे पुढे करून झाडे मुळासकट तोडली जात आहेत. त्याकडे महापालिकेच्या उद्यान विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची तक्रार जनसंवाद सभेत करण्यात आली. अशा प्रकारे झाडे तोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी, अशी सूचनाही करण्यात आली. पालिकेच्या सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा सोमवारी (दि.12) झाली. त्यात नागरिकांनी वरील तक्रार केली.

सभेत एकूण 57 नागरिकांनी सहभाग घेत 75 पेक्षा अधिक तक्रारी मांडल्या. तक्रार करताना नागरिक म्हणाले की, विविध कारणांमुळे शहरातील मोठमोठी झाडे एका रात्रीत तोडली जातात. त्यात खासगी व महापालिकेच्या झाडांचीही कत्तल केली जात आहे. असा प्रकार नुकताच मोहननगर, चिंचवड येथील महात्मा फुले उद्यान आणि निगडी परिसरात घडला. याप्रकरणी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात आल्यानंतर उद्यान विभागाने पालिकेच्या तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले. तर, झाडे तोडणार्‍या खासगी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पालिकेची पूर्वपरवानगी न घेता झाडे तोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जावी, अशी तक्रार नागरिकांनी केली.
तसेच, शहरातील सीसीटीव्ही बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे.

शहरातील उद्यानांची नियमितपणे स्वच्छता करण्यात यावी. उद्यानांमधील बंद पडलेली विद्युत व्यवस्था सुरळीत करण्यात यावी. रस्त्याच्या कडेला, पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत. त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या मध्यभागी, गतिरोधक आणि पदपथांवरील निघालेले पेव्हिंग ब्लॉक तात्काळ बसवावेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल याची दक्षता घ्यावी. रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या.

विद्युत खांबांवर, उद्यानांमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स काढण्यात यावेत. अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार्‍यांवर कारवाई करावी. पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करावा. नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात. कचरा संकलित करण्यासाठी येणार्या घंटागाड्या नियमित येतील याची दक्षता घ्यावी. उघड्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, रस्त्यांचे कामे तातडीने पूर्ण करावीत. सार्वजनिक शौचालयांमधील बंद असलेले दिवे बदलावे, अशा तक्रारी सभेत करण्यात आल्या.

सभेचे अध्यक्षपद अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी भूषवले. या वेळी क्षेत्रीय अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news