

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ऊसतोडणी मजूर किराणा दुकानातून माल घेऊन जात असताना तिघांनी त्याला अडवत त्याच्याकडील किराणा साहित्य व खिशातील 1350 रुपये बळजबरीने काढून घेतले. चोपडज (ता. बारामती) येथे ही घटना घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
गणेश गुंजले, रवींद्र गायकवाड व सुरज गायकवाड (रा. चोपडज, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कैलास महेंद्र पवार (मूळ रा. डांगुर्णे, ता. सिंदखेडा, जि. धुळे) यांनी फिर्याद दिली. सोमवारी (दि. 12) रात्री आठ वाजता ही घटना घडली. ऊसतोडणी करून आल्यानंतर फिर्यादी हे रात्री किराणा माल आणण्यासाठी चोपडजमधील देशपांडे यांच्या दुकानात गेले होते.
तेथे किराणा साहित्य खरेदी करून ते रस्त्याने जात असताना मोटारसायकलवर तिघे आले.
त्यांनी फिर्यादीला अडविले. तुझ्याकडे जे काही सामान, पैसे आहेत ते आम्हाला दे, अशी मागणी केली. माझे साहित्य घेऊ नका, अशी विनवणी फिर्यादीने केली. परंतु, या तिघांनी त्यांच्याकडील किराणा जबरदस्तीने हिसकावला. खिशात हात घालत 1350 रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना शिवीगाळ केली. याबाबत कोणाला काही सांगितल्यास जिवे मारून टाकू, अशी धमकी देत ते निघून गेले. ही घटना फिर्यादीने टोळी मालक महादेव सोमनाथ गाडेकर यांना सांगितली. त्यानंतर याप्रकरणी फिर्याद देण्यात आली.