सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे सुकली; सातारा रस्ता, कात्रज बाह्यवळण मार्गावरील चित्र | पुढारी

सुशोभीकरणासाठी लावलेली झाडे सुकली; सातारा रस्ता, कात्रज बाह्यवळण मार्गावरील चित्र

धनकवडी; पुढारी वृत्तसेवा : सातारा रस्त्यावर राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात आणि कात्रज बाह्यवळण मार्गावर दुभाजकांमध्ये, तसेच रस्त्यांच्या बाजूने सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली अनेक फुलझाडे पाण्याअभावी सुकून गेली आहेत. काही ठिकाणी यातील झाडेवेली तोडण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गांचे बकालीकरण वाढले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कात्रज परिसरातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात महापालिकेने सातारा रस्त्याचे सुशोभीकरण केले आहे. या ठिकाणी शोभेच्या झाडांसह फुलझाडेदेखील लावण्यात आली आहेत. यामुळे या रस्त्याला शोभा आली आहे.

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या झाड्यांच्या संवर्धनाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या झाडांना वेळेवर पाणी दिले जात नसल्याने ती सुकून गेली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर, काही ठिकाणी फुलझाडी पूर्णपणे वाळून गेली आहेत. या झाडांची छाटणी करण्यात न आल्याने ती अस्ताव्यस्त वाढली आहेत. ज्या ठिकाणी झाडे वाळलेली आहेत, ती काढून टाकून त्या ठिकाणी नव्याने झाडे लावावेत. तसेच, या झाडांच्या संवर्धनाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बाह्यवळण मार्ग सहापदरी करण्यासह दोन्ही बाजूला सेवा रस्त्याचे (सर्व्हसि रोड) कामदेखील सध्या सुरू आहे. त्यामुळे हा रस्ता पुण्यासाठी निश्चितच भूषणास्पद आहे. मात्र, या रस्त्यामधील फुलझाडे सध्या पाण्याअभावी सुकून गेली आहेत. यामुळे हा रस्ता आता बकाल दिसू लागला आहे. ही झाडे सुकल्याने रात्रीच्या वेळी समोरून येणार्‍या वाहनांची लाईट दुसर्‍या बाजूने येणार्‍या वाहनचालकांच्या डोळ्यांवर पडते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

यामुळे सुशोभीकरणाच्या मूळ हेतूला हरताळ फासला असल्याचे नागरिक व वाहनचालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कात्रज बाह्यवळण मार्गावर दुभाजकांमध्ये असलेल्या फुलझाडांच्या संवर्धनाकडे आगामी दिवसांत लक्ष देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सातारा रस्त्यावरील दुभाजकात, तसेच राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या परिसरातील फुलझाडीचे सुशोभीकरण करण्यात येईल. वाढलेल्या झाडांची छाटणी करण्यात येईल. तसेच, ज्या ठिकाणी झाडे वाळली आहेत, तेथे नव्याने झाडे लावण्यात येतील.

                                                                 -दिलीप पांडकर,
                                                      उपअभियंता, पथविभाग, महापालिका

Back to top button