पुणे : जिल्हाधिकार्‍यांकडून विजयस्तंभ अभिवादन नियोजनाचा आढावा | पुढारी

पुणे : जिल्हाधिकार्‍यांकडून विजयस्तंभ अभिवादन नियोजनाचा आढावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा (कोरेगाव भीमा) येथे 1 जानेवारी 2023 रोजी होणार्‍या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विजयस्तंभ परिसराला भेट देऊन पाहणी केली तसेच आढावा घेतला. या वेळी पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, तहसीलदार किरण सुरवसे, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, विजयस्तंभ स्मारक समितीचे पदधिकारी उपस्थित होते.

देशभरातील अनुयायी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांना सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. त्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयक अधिकारी नेमावा. येणार्‍या अनुयायांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी व नियोजित वेळेत आवश्यक काम पूर्ण करावे असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी विजयस्तंभ परिसरात नियोजनाशी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यांनी आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पीएमपीएमएल, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग आदी विविध विभागांच्या नियोजनाचा आढावा घेतला. तसेच वाहनतळ व इतर व्यवस्थेसंबंधी ठिकाणांना भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

 

Back to top button