इन्कम टॅक्सची मोठी कारवाई: पुण्यातील बिल्डारांवर छापे, अनेकांचे धाबे दणाणले | पुढारी

इन्कम टॅक्सची मोठी कारवाई: पुण्यातील बिल्डारांवर छापे, अनेकांचे धाबे दणाणले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बेहिशोबी मालमत्ता व कागदपत्रातील हेराफेरी वरून आयकर विभागाने पुण्यातील अनेक बिल्डरांवर बुधवारी पहाटे छापे मारले. खासगी वाहनातून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कागदपत्रे जप्त केली. कागदपत्रांच्या छाननीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

आयकर विभागाच्या पथकाने बुधवारी पहाटे खासगी वाहनातून येत एकाच वेळी २९ ठिकाणी छापेमारी केली. पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असून नगर रोडवरील मोठ्या बिल्डरासह चॉईस उद्योग समूहाचे अशोक अग्रवाल यांच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने दहा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची पथके तैनात करून एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत बिल्डरांच्या कार्यालयासह घरातून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तपासली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेली रोकड व बँकेचे व्यवहार तपासून ती जप्त करायची की नोंद घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे.

अग्रवाल यांचे शहरात अनेक प्रोजेक्ट असून त्यांचा ‘ धवन प्रोजेक्ट ‘ हा महत्त्वाचा प्रोजेक्ट सध्या चर्चेत आहे. आतापर्यंत केलेल्या प्रकल्पाची कागदपत्रे व धवन प्रोजेक्टच्या कागदपत्रांमध्ये हेराफेरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व कागदपत्रांची छाननी सुरू असून आयकर विभागाकडे असलेल्या नोंदीमध्ये तफावत आढळल्यास संबंधितांवर कारवाई करून ताब्यात घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयकर विभागाकडून बिल्डरवर होत असलेली कारवाई पाहता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. काही बिल्डरांना छाप्याची माहिती मिळताच काहीजण कार्यालय बंद करून भूमिगत झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button