

बारामती, पुढारी वृत्तसेवा: सोनगाव (ता. बारामती) येथे गीतेवस्ती शेजारील निरा नदीकाठी बेकायदा माती उत्खनन राजरोसपणे चालू आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अंतर्गत रस्ते खराब होऊन उडणार्या धुळीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. येथील बेकायदेशीर उत्खनन बंद करण्याची मागणी संदेश गीते यांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागांकडे केली आहे.
बांधकाम विभागाच्या नियमानुसार अधिक क्षमतेच्या वाहनांना अंतर्गत रस्त्यावरून वाहतूक करण्यास मनाई आहे. नदीलगत 8 ते 10 फुट खोल उत्खनन केल्यामुळे नदीचे पाणी शेतामध्ये घुसण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडले आहेत. शेती वाहून जाण्याची शक्यता असल्याने यावर तातडीने बंदी घालण्याची मागणी गीते यांनी केली आहे.
कर्हा नदी व निरा नदीच्या संगमात बसलेले प्राचीनकालीन सोमेश्वराचे मंदिर आहे. या रस्त्यावरून इतर सर्व जिल्ह्यातून पर्यटक येत असतात. माती उत्खननामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता आहे.
या अगोदर ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे माहिती दिली होती. त्या वेळी तात्पुरत्या स्वरुपात काम बंद करण्यात आले होते. परंतु, पुन्हा माती उत्खननाचे काम सुरू झाले आहे. वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक सुरू असल्याने रस्ते खराब होत असल्याची तक्रार गीते यांनी केली आहे. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तहसील कार्यालयाने माती वाहतुकीसाठी तात्पुरता गौण खनिज परवाना दिल्याने ही माती वाहतूक सुरू असल्याचे समजते.