

पुणेः पुढारी वृत्तसेवा : मांजरी बुद्रुक व हडपसर परिसरातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. दरम्यान सोमवारी (दि.12) हडपसर परिसरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावरच मोर्चा काढून कोयता गँगच्या दहशतीचा पाढा वाचला होता.
त्यानंतर आता कोल्हे यांनी हे पत्र पाठविले आहे. शहराच्या उपनगरातील मांजरी बुद्रुक, हडपसर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक पोलिस ठाण्याचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. मांजरी बुद्रुक येथील कोयता गँगमध्ये अनेक अल्पवयीन मुले सामिल होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गुन्हेगारी कृत्य करणार्या कोयता गँगला पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप करत नागरिकांनी मोर्चा काढला होता.