पुणे: राज्यपालांसह राज्यकर्त्यांवर कारवाई करा, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी | पुढारी

पुणे: राज्यपालांसह राज्यकर्त्यांवर कारवाई करा, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे. या संदर्भात भाजपाचे सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची त्वरीत हकालपट्टी करावी तसेच भाजपाच्या मंत्र्यांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर यांच्या वतीने पुणे बंदच्या पार्श्वभुमीवर मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मुक मोर्चाच्या समारोप प्रसंगी आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, संतोष शिंदे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपक मानकर, युवराज दिसले, गणेश मापारी, विराज तावरे, प्राची दुधाणे, सारीका जगताप यांसह विविध शिवप्रेमी संघाचे पदाधिकारी, राजकीय आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, मुस्लिम संघटनांचे नेते आणि पुणेकर नागरिक उपस्थित होते.

अंधारे म्हणाल्या, भाजपच्या नेत्यांकडून जाणुनबुजुन महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे आहेत, बाकी महापुरुष नकोत. भाजपाला ऐकायचं नसेल तर आम्ही असं समजु की, भाजप महापुरुषांच्या विरोधात आहे. आजचा मोर्चा म्हणजे आंदोलनाची सुरुवात आहे. केंद्र सरकारने त्वरीत राज्यपालांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाच्या मंत्र्यांवरही कारवाई करावी. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

देवेंद्र फडणवीसांवर टिकास्त्र

त्या पुढे म्हणाल्या की, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकस आहे. त्यांच्याच अधिपत्याखाली एका-एका राजकारण्याकडून महापुरुषांचा ठरवून अपमान केला जातोय. भाजपचं शिवरायांवरचं प्रेम बेगडी आहे. त्यांना महापुरुषांपेक्षा खुर्ची महत्त्वाची वाटत असेल तर त्यांच्या खुर्च्या हिसकावल्या पाहिजेत.

यावेळी येसाजी कंक यांचे 14 वे वंशज तन्वी प्रदिप कंक, प्रशांत जगताप, दिपक मानकर, संतोष शिंदे, सचिन आडेकर आदिंनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

राजीनामा देण्यासाठी उदयनराजे दिल्लीला रवाना ?

छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे आपल्यासोबत हार घालायला होते, त्यामुळे ते व्यासपीठावर निषेध नोंदवायला या ठिकाणी येतील आणि आम्ही त्यांच्या समोर बोलू शकू. त्यांना आम्ही काही सांगू. ते आम्हाला काहीतरी ऐकवतील असं वाटलं होतं, पण ते नाहीत, कदाचित त्यांना महापुरुषांचा झालेला अवमान सहन झाला नसेल आणि तडकाफडकी ते लगेच राजीनामा द्यायला दिल्लीला गेले असतील. आम्ही चांगला विचार करणारे लोकं आहोत, उदयनराजे यांच्या बद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. ज्या अर्थी ते येथे हार घालायला आले होते, त्या अर्थी महापुरुषांच्या सन्मानासाठी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा सुद्धा देतील. राजे म्हणजे पाच आणि दहा हजारावर मनसबदारी करणारे नव्हे, उदयनराजे राजे आहेत, मनाचे राजे आहेत, असो टोलाही उदयनराजे यांना सुषमा अंधारे यांनी यावेळी लावला.

राम कदम यांना दिला इशारा…

रामभाऊ आमचा अजिबात नाद करायचा नाही. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आणखी रोष वाढावा यासाठी राम कदम आणि टीम देवेंद्र यांचं हे षडयंत्र आहे. राम कदम तुम्हाला हे वाक्य परवडणारं नाही, पायाच्या दोन बोटात दगड पकडून मागच्या मागे माणूस आऊट करण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही की, घरात घुसू, अमूक करु. आम्ही तुमचं घरसुद्धा घुसण्यासाठी ठेवणार नाही असा इशारा सुषमा अंधारे यांनी राम कदम यांना दिला आहे.

मतपेटीसाठी शाई महत्त्वाची…

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक ही चुकीचीच आहे. मात्र अशा पध्दतीने शाईफेक करुन शाई वाया घालवु नका. अशा प्रकारची शाई साठवुन ठेवुन ती बोटांना लावायला शिल्लक राहु द्या. येणार्‍या निवडणुकांमध्ये मतपेटीच्या माध्यमातूनच त्यांना महत्त्व पटवुन द्या, असे आवाहन ही अंधारे यांनी यावेळी केली.

Back to top button