पोलिसांची नव्हे, कोयता गँगची दहशत! हडपसर भागात गुन्हेगारांचा धुडगूस | पुढारी

पोलिसांची नव्हे, कोयता गँगची दहशत! हडपसर भागात गुन्हेगारांचा धुडगूस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरात गुन्हेगारी टोळक्यांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस त्यांचा मुजोरपणा वाढत आहे. मांजरी परिसरात तर कोयता गँगची दहशत पसरली आहे. जे नागरिक गुंडांना विरोध करतात, त्याच्या घरांवर या टोळीचे सदस्य दगडफेक करीत आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागात पोलिसांची नव्हे, तर कोयता गँगची दहशत असल्याचे बोलले जात आहे.

गुंडांचा मुजोरपणा वाढत असल्यामुळे मांजरी येथील त्रस्त नागरिकांनी सोमवारी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्या निवेदनाची प्रत या वेळी पोलिसांना देण्यात आली. परिसरात वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न जटिल बनला आहे. मांजरी, काळेपडळ, गंगानगर या भागात छोट्या छोट्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी त्यांच्यात वाद होतात. त्यातच आता पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता गँग पुन्हा सक्रिय झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या गँगचा त्रास मांजरी परिसरातील नागरिकांना होत आहे. रस्त्याने जाणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना अडवून त्याची लूटमार करणे, महिलांचे दागिने हिसकावणे, हवेत कोयते फिरून दहशत निर्माण करणे, यांसह गुंडांच्या विविध कृत्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, गुंडांची दहशत कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. तक्रार देणार्‍यांच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे.

या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या मांजरी येथील नागरिकांनी मोर्चा काढून पोलिसांना कोयता गँगविरोधात निवेदन दिले. या टोळीचे बहुतांश सदस्य अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता या टोळीवर कठोर कारवाई करावी; अन्यथा पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे.

गँगच्या दहशतीतूत मुक्त करा!
गुन्हेगार अल्पवयीन असल्याचे सांगून पोलिस कारवाईत पळवाट शोधत आहेत. या अल्पवयीन गुन्हेगारांना कायम कायद्यातून सूट मिळते. मात्र, यापूर्वी कधी नव्हते, एवढे वर्चस्व आता का निर्माण झाले? याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचे समुपदेशन करा, मात्र आम्हाला कोयता गँगच्या जोखडातून मुक्त करा, अशी मागणी मांजरी येथील नागरिकांनी केली आहे.

आता तसे का होत नाही?
हडपसर पोलिस स्टेशनला यापूर्वी पोलिस निरीक्षक होते. त्यांनी खंबीरपणे कोयता गँगचे वर्चस्व मोडीत काढले होते. गुन्हेगार अल्पवयीन असले, तरी त्यांना पाठीशी घालणार्‍यांना पोलिसी खाक्या दाखवल्यामुळे यासारख्या गँगचे वर्चस्व मोडीत निघाले होते. मात्र, आता दुर्दैवाने असे होताना दिसत नाही.

मांजरी बुद्रुक परिसरातील कोयत्या गँगमधील गुंडांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांना पकडून लवकरच कारवाई केली जाईल.

                                      अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Back to top button