ओतूरला बिबटयांचे हल्ले सुरूच; चालत्या दुचाकी स्वारांवर बिबट्याची झेप | पुढारी

ओतूरला बिबटयांचे हल्ले सुरूच; चालत्या दुचाकी स्वारांवर बिबट्याची झेप

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या दुचाकीवरून घरी परतणाऱ्या दोघांवर बिबट्याने चालत्या दुचाकीवर झेप घेऊन हल्ला केला असता दुचाकी चालक १९ वर्षीय युवक आदित्य संदीप वाकचौरे याने स्वतः च्या बचावासाठी बिबट्याला लाथ मारण्याचे धाडस केले. मात्र अशा थरारक परिस्थितीत बिबट्याने दुचाकीवर मागे बसलेले अक्षय बाळासाहेब अहिनवे (वय २८ ) याच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. दोघांच्या आरडा ओरड्याने बिबट्याने घटनास्थळावरून काढता पाय घेतला व पुन्हा उसाच्या शेतात दडी मारली.

ही थरारक घटना घोटी शिवार मांदारने रोडवर अशोक आणि आत्माराम सखाराम अहिनवे यांच्या जमिनीजवळ रात्री सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली असून या परिसरात बिबट्याने नागरिकांना वारंवार दर्शन देत व मानवी हल्ले चढवून दहशत माजविल्याने स्थानिक नागरिक भयभीतपणे वावरत आहेत अशी माहिती अशोक अहिंनवे यांनी दिली. गेल्याच आठवड्यात अवघ्या १२ तासात आपल्या आई सोबत घरी पायी जाणाऱ्या ७ वर्ष वयाच्या पवन मधे या मुलावर बिबट्याने अंधाराचा फायदा घेत अचानक हल्ला करून मुलाला गंभीर जखमी केले होते.

ही घटना ओतूरच्या ढमाले मळ्याजवळील शिवारात ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वा.५० मि. च्या दरम्यान घडली होती. तर दुसऱ्याच दिवशी ६ डिसेंबर रोजी बरोबर १२ तासाच्या आत पहाटेच्या सुमारास क्लासला पायी जाणाऱ्या १९ वर्षांच्या युवतीवर बिबट्याने हल्ला केला होता. काल दुचाकीस्वारांवरील झालेला हा तिसरा हल्ला व अगोदरच्या घडलेल्या दोन्ही घटना अवलोकन करता बिबटयांचा आक्रमकपणा आणि रोडावलेली संख्या अधिकाधिक स्पष्ट होत आहे. दरम्यान बिबट्याने हल्ला केलेल्या दोन्ही जखमींना ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी पुणे पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

अवघ्या २ आठवड्यात बिबट्याने केलेला हा तिसरा मानवी हल्ला चिंता वाढविणारा असून ओतूर परिसरात बेसुमार वाढलेली बिबट संख्या व मानव बिबट संघर्ष रोखण्यासाठी आंबेगव्हान येथील प्रस्तावित बिबट सफारी कामाला जलदगतीने चालना देण्याची व घटनास्थळा जवळ तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

Back to top button