नवी सांगवी : व्हॅनचा दुकानाला धडकून पिंपळे गुरवमध्ये अपघात | पुढारी

नवी सांगवी : व्हॅनचा दुकानाला धडकून पिंपळे गुरवमध्ये अपघात

नवी सांगवी; पुढारी वृत्तसेवा : पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील 10 ईलाईट सोसायटीसमोर इको व्हॅन हे चारचाकी वाहन सलूनच्या दुकानाला जोरदार धडकून अपघात झाला. त्यामध्ये चारचाकी वाहनाची पुढील बाजू चक्काचूर झाली. तसेच सलूनच्या दुकानाचे शटर, दुकानातील काचेची फ्रेम, काचेचे दरवाजे तुटून दुकानात काचांचा खच निर्माण झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

येथील रामकृष्णपासून काटे पुरमच्या दिशेने मुख्य रस्त्यावरून येत असताना 10 ईलाईट सोसायटीसमोर सकाळी सातच्या सुमारास अपघात घडून आला. यामध्ये एम एच 14 के जे 1264 हे इको चारचाकी वाहन सह्याद्री कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येत असताना वाहनचालकाचा क्लच व ब्रेक न लावता इक्सिलेटरवर पाय पडला. त्यामुळे चारचाकी वाहन भरधाव वेगाने रस्त्यावर धावत असताना वाहनचालकाने प्रसंगावधान राखत एका सलूनच्या दुकानाला धडकवली.

वाहनचालक निर्मल राणे (वय 35), रा. नेताजी नगर, काटेपुरम चौक हा नुकतीच दोन महिन्यांपूर्वी नवीन घेतलेले स्वतःच्या मालकीचे चारचाकी वाहन फेरफटका मारण्यासाठी घेऊन जात असताना अपघात घडून आला. सलून दुकान मालक रेहमद शेख वय (32) रा. सह्याद्री कॉलनी यांच्या दुकानावर सकाळी सात वाजताच्या सुमारास व्हॅन धडकून अपघात झाला. एक महिन्यापूर्वीच दुकानाचे दोन ते अडीच लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले होते. त्याचे खूप मोठे नुकसान झाले.

सोमवारी सकाळी सातच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नियमित व्यायाम करणारे तसेच फेरफटका मारणार्‍या नागरिकांची रेलचेल असते. शाळा सुरू असल्याने वाहनांची तसेच स्कूल बसचीदेखील येथील रस्त्यावरून वर्दळ सुरू असते. त्यामुळे घटनास्थळी प्रत्यक्ष अपघात घडून येत असताना दिनेश कोकणे यांनी पाहिले होते. त्यांनी त्वरित सांगवी पोलिस बिट मार्शलला फोनवर संपर्क करून कळविले.

बिट मार्शल हंसराज गोरे काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून वाहनचालकाला ताब्यात घेतले. या वेळी सलून दुकानात कर्मचारी झोपला असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी शटर उचकटून बाहेर काढले. शटरमधील कर्मचारी, वाहनचालक हे किरकोळ जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

Back to top button