मेक अपची हौस पडली चांगलीच महागात ! झाली सव्वा लाखांची चोरी | पुढारी

मेक अपची हौस पडली चांगलीच महागात ! झाली सव्वा लाखांची चोरी

राजगुरुनगर :पुढारी वृत्तसेवा : ब्युटीपार्लरमध्ये मेकअप करण्यासाठी आलेल्या महिलेचे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना राजगुरुनगर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेबाबत महिलेने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांकडुन मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला मेकअप करण्यासाठी शहरातील नगरपरिषदेच्या पाठीमागे असलेल्या एका ब्युटी पार्लरमध्ये आली होती.

मेकअप करण्यापूर्वी महिलेने गळयातील १ लाख ३७ हजार रुपये किंमतीचे गळ्यात असलेले दागिने पाणी व केमिकल लागून खराब होऊ नये म्हणून मेकअप करणाऱ्या व्यक्तीकडे काढून दिले. त्या व्यक्तीने समोरील कपाटात ठेवले. फिर्यादी महिला मेकअप झाल्यानंतर तशीच घरी गेली. घरी आल्यावर आरशासमोर उभ्या राहिली तेव्हा गळयातील दागिने पार्लरमध्ये विसरल्याचे लक्षात आले.

दागिने शोधण्यासाठी पुन्हा ब्युटी पार्लरमध्ये आल्यानंतर दागिने मिळून आले नाही. या घटनेचा पुढील तपास खेड पोलिस करत आहे. पोलिसांच्या माध्यमातून दागिने मिळतातं की नाही हे समोर येईलच. तूर्त मुखवटा रंगवताना तो रंग सव्वालाखला पडल्याने महिलेचा चेहरा पडला होता हे सांगणे योग्य.

Back to top button