पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्या रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या मांजराचा मृत्यू झाल्याने एक महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर येथील भाजी मंडई जवळील डॉग अॅण्ड कॅट क्लिनिकमध्ये घडला. याप्रकरणी डॉ.रामनाथ येण्याबापु ढगे (वय-51,रा.हडपसर,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक महिला व चार अनोळखी इसम यांचे विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 10 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचे हडपसर भागातील डॉग अॅण्ड कॅट क्लिनिक येथे घडला आहे.
आरोपींनी उपचारसाठी आणलेल्या मांजराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ करुन मांजर कसे झोपले आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांचा पाच फ्रॅक्चर झाला. तसेच त्यांनी डॉक्टरांचे क्लिनिकमधील वस्तूंची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. या घटनेचे चित्रिकरण क्लिनिकमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.