पुणे : पोलिस आयुक्तांचे मोक्काचे चालू वर्षातील अर्धशतक | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्तांचे मोक्काचे चालू वर्षातील अर्धशतक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : टोळीचे वर्चस्व निर्माण व्हावे यासाठी सिंहगड रस्ता परिसरात दहशत माजविणार्‍या सराईत नीरज ढवळे टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 113 वी कारवाई आहे. या वर्षांतील मोक्काची 50 वी आहे. बहुतांश टोळ्या जेरबंद असल्यामुळे ठिकठिकाणी गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.

निरज लक्ष्मण ढवळे (वय 22, टोळीप्रमुख रा. साईनगर, हिंगणे खुर्द), सुरज संतोष ढवळे (वय 19 , रा. साईनगर, हिंगणे खुर्द), अनिकेत उर्फ अ‍ॅण्डी देविदास कांबळे (वय 20 रा. वडगाव बुद्रुक), किरण विठ्ठल शिंदे (वय 20 रा. भुमकर मळा, नर्हे), आतिश राम पवार (वय 20 ) यांच्यासह तिघा अल्पवयीनांविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

सराईत नीरज याने इतर साथीदारांच्या मदतीने सिंहगड रोड परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. मारामारी करणे,खुनाचा प्रयत्न करणे,कोयता आणि इतर घातक शस्त्रे जवळ बाळगणे, दंगा करणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे टोळीविरूद्ध दाखल आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी पोलीस उपायुक्त सुहैल शर्मा यांच्यावतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला. सहआयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त सुहैल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक गणेश मोकाशी यांच्या पथकाने केली.

Back to top button