पुणे : परराज्यातील मटार स्वस्त; पंजाब, मध्यप्रदेशातून बाजारात 20 ते 25 ट्रक मटार दाखल | पुढारी

पुणे : परराज्यातील मटार स्वस्त; पंजाब, मध्यप्रदेशातून बाजारात 20 ते 25 ट्रक मटार दाखल

पुणे : देशातील मध्य प्रदेश व पंजाब येथून मटारची आवक वाढली आहे. महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने सुरू असलेली विक्री आत्ता 40 ते 50 रुपयांवर आली आहे. मटार स्वस्त असल्याने बाजारात मटारला मागणीही चांगली असून त्याच्या खरेदीसाठी गर्दी वाढल्याचे चित्र आहे. मटारखेरीज बाजारात पावटा व बटाट्याचीही मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.

त्या तुलनेत मागणी नसल्याने त्यांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक आवक झाली. बाजारात जुन्या कांद्यासह नव्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नव्या कांद्याचा हंगाम सुरू झाल्याने शेतक़र्‍यांकडून साठवणुकीतील जुना कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात पाठविण्यात येत आहे. परिणामी, रविवारी बाजारात कांद्याची आवक गत आठवड्यापेक्षा 25 ट्रकने वाढली. त्यातुलनेत मागणीही कायम राहिल्याने दर मात्र स्थिर होते.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये तामिळनाडू, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथून सुमारे 10 ते 12 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून 2 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 2 ते 3 टेम्पो घेवडा, 4 ते 5 टेम्पो कोबी, 2 टेम्पो तोतापुरी कैरी, बेंगलोर येथून 2 टेम्पो आले, राजस्थान येथून 9 ते 10 टेम्पो गाजर, मध्य प्रदेश व पंजाब येथून 25 ट्रक वाटाणा तर मध्य प्रदेशातून लसणाची 10 ते 12 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 900 ते 1000 पोती, टोमॅटो 10 ते 11 हजार क्रेटस्, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 14 ते 15 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, कांदा 125 ट्रक यांसह तळेगाव, आग्रा व इंदौर येथून बटाटयाची 40 ते 45 ट्रक इतकी आवक झाली.

पालेभाज्यांच्या भावात घसरण
रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे विभागातून कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार व मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक 25 हजार जुड्यांनी वाढली, तर मेथी आवक 30 हजार जुड्यांनी घटली. बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांना अपेक्षित मागणी नसल्याने किरकोळ बाजारात कोथिंबीर, कांदापात, मुळे व पालकच्या भावात गड्डीमागे पाच रुपयांनी घसरण झाली. तर, करडईचे भाव गड्डीमागे 5 रुपयांनी वधारले. उर्वरित सर्व पालेभाज्यांची आवक जावक कायम असल्याने भाव टिकून राहिले. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 3 ते 12 रुपये तर किरकोळ बाजारात 5 ते 25 रुपये इतके राहिले.

Back to top button