पिंपरी : भ्रमात राहू नका, निवडणुका कधीही लागतील : अजित पवार | पुढारी

पिंपरी : भ्रमात राहू नका, निवडणुका कधीही लागतील : अजित पवार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, अशा सूचना करत, मेरीट असलेल्यांना तिकीट दिले जाईल, असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचार वेध मेळाव्यात रविवारी (दि.11) दिला. या वेळी माजी मंत्री छगन भुजबळ, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, नेते आझम पानसरे, माजी महापौर संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, कोणीही सत्तेचे ताम्रपत्र घेऊन जन्माला आलेले नाही. पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाने डोंगराएवढी कामे करूनही सत्ता गेली. कोणीही भ्रमात राहू नये. हिमाचल व दिल्लीच्या निकालावरूपन ते स्पष्ट होते. मला अमूक प्रभागात तिकीट हवे, असा आग्रह धरू नका. मेरीटनुसार तिकीट दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहचवा. नागरिकांशी संवाद वाढवा. जनरेशन गॅप पडू देऊ नका. प्रभावी असलेल्या सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करा. आपआपसातील हेवेदावे दूर ठेऊन पक्षासाठी झटून काम करा. मेळाव्यातील विचार कृतीत आणा, अशा सूचना त्यांनी केल्या.

देश व राज्यातील पत्रकारिता सध्या दबावात काम करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या महापुरूषांचे वारंवार अवमान, कर्नाटक सीमावाद, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत, या प्रकाराच्या निषेधार्थ शनिवारी (दि.17) आयोजित मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंदोलनास गायब होणार्‍या पदाधिकार्‍यांना सज्जड दम

शहरात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आहेत. पद घेतल्यानंतर त्या बैठका व आंदोलनास येत नाहीत. हे चालणार नाही. महिलांसह , विद्यार्थी व युवकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अ‍ॅक्टीव्ह व्हावे. पक्षाने दिलेल्या तसेच, स्थानिक मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करा, असा सज्जड दम देत अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

82 हजार बाटल्या रक्त संकलनाचा निर्धार

राज्यात रक्तांची कमतरता असल्याने शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सात दिवस रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यात तब्बल 82 हजार बाटल्या जमा करण्याचा निर्धार आहे. सर्वांनी रक्तदान करावे. त्यामुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. ते रक्त लगेच तयार होते. दर तीन महिन्यांनी रक्तदा करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

महापालिकेतील भ्रष्टाचारावर भाजपने लक्ष घालावे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भामा- आसखेड पाणी योजनेसाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशनचे 121 कोटींचे काम 151 कोटींवर नेऊन उधळपट्टी केली जात आहे. सत्ताधारीच एकमेकांवर आरोप करीत आहेत. अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यावर कोणाचे कंट्रोल नाही. नागरिकांच्या पैशांचा गैरवापर सुरू आहे. मेट्रोच्या कामाला गती नाही. राज्यात सत्ता येऊन सहा महिने झाले तरी, शहरातील विकासकरामांच्या उद्घाटनाला भाजप नेत्यांना वेळ मिळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. गहाळ बसू नका, भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत. ते बाहेर काढा. त्या विरोधात आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कोठे आहे राजू, मयूर, डब्बू?

माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक मयूर कलाटे, डब्बू आसवाणी दिसत नाहीत, असे अजित पवार यांनी विचारले. दुपारी होते, लग्नाला गेलेत असे उत्तर त्यांना पदाधिकार्‍यांनी दिले. खरेच लग्नाला गेले की, दुसरे लग्न करायले गेले आहेत, हे शोधावे लागेल, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. ‘आओ- जाओ घर तुम्हारा, असे वागणे खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button