बारामती : ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांचा जीव टांगणीला | पुढारी

बारामती : ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

बारामती; पुढारी वृत्तसेवा : हवामान विभागाने राज्यभरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. परिणामी पिकांच्या नुकसानीच्या भीतीने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिके जोमदार वाढीस लागली आहेत. त्यांच्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी शेतक-यांना आशा निर्माण झाली आहे.

अचानक आलेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतक-यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या पावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले होते. शेतक-यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले होते. मात्र, तरीही चांगल्या पाऊसमानामुळे शेतक-यांनी रब्बी हंगामातील पिके घेण्याचा उत्साह दाखवला होता.

त्यासाठी स्वत:जवळ असलेला पैसा कसा तरी उभा करून नव्या उमेदीने रब्बी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. वातावरण चांगले राहिल्याने पिकांची वाढही जोमदार होत असताना शेतक-याला खरिपातील नुकसानीची भरपाइ रब्बी हंगामात होण्याची आशा निर्माण झाली होती.
थंडीमुळे गहू आणि हरभरा पिकांना फायदा होत असतानाच रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण पडू लागल्याने त्याचा परिणाम पिकांवर होणार आहे. रविवारी तर तालुक्यात दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. असे वातावरण बागायती पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव करण्यास हातभार लावणार आहे. परिणामी शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

पावसाळा गाळप हंगामालाही बसणार फटका
तालुक्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ऑक्टोबरच्या पावसामुळे जवळपास 15 दिवस गाळप हंगाम लांबला. सध्या पाऊस झालाच तर गाळप हंगामावर परिणाम होणार असून नुकसानीची चिंता शेतकर्‍यांना लागली आहे.

 

 

Back to top button