वेल्हे : शेतीमालास उपनगरांत बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात : दत्ताभाऊ पायगुडे | पुढारी

वेल्हे : शेतीमालास उपनगरांत बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात : दत्ताभाऊ पायगुडे

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुका व परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीमालाला सिंहगड-एनडीए रोड अशा उपनगरांत बाजारपेठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे, असे हवेली तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ पायगुडे यांनी खडकवाडी (ता. हवेली) येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन शिबिरात सांगितले. पायगुडे म्हणाले की, पुणे शहरासभोवती असलेल्या हवेली तालुक्यातील शेतीचे क्षेत्र वाढत्या नागरीकरणामुळे कमी झाल्याने शेतीमालाला जवळच बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

मात्र, प्रचंड वाहतुकीमुळे पूर्वीप्रमाणे रस्त्यावर भाजीपाला, शेतीमालाची विक्री करणे शेतकर्‍यांना गैरसोयीचे झाले आहे. याबाबत प्रशासनाने संबंधित विभागाच्या समन्वयाने वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा जागा तसेच खडकवासला धरण, मुठा कालवा परिसरातील पडीक जागा, विकास आराखड्यातील जागा स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीमालाच्या विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात. त्यामुळे शेतकर्‍यांना तसेच स्थानिक रहिवाशांची सोय होणार आहे.

या वेळी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हवेली तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, मंडळे तसेच ग्रामस्थांच्या वतीने दत्ताभाऊ पायगुडे यांचा नागरी सन्मान करण्यात आला. खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेशअण्णा गुजर, भगिरथ शिक्षण संस्थेचे सचिव रवींद्र नेर्लेकर, शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण माताळे, रवींद्र पायगुडे, राजेंद्र ढमढेरे, विजय तनपुरे, उपसरपंच बंडू भगत, सुरेश तांगुदे, यशवंत तांगुदे आदी उपस्थित होते.

Back to top button