खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून रविवारी (दि. ११) खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले. सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू होऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते बंद करण्यात आले. तोपर्यंत टोलनाक्यावरून वाहने मोफत सोडण्यात आली.
रविवारी सकाळी १० वाजता रिपाइंतर्फे खेड शिवापूर टोलनाका बंद करून आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आरपीआयचे प्रदीप कांबळे, प्रवीण ओव्हाळ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र कोंडे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.
हा संयुक्त पुरोगामी महाराष्ट्र ज्यांनी घडवला, अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोशारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या मतपेट्या भरण्यासाठी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याला कदापिही यश येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले असतील किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ज्योत कायम तेवत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध एकत्र येऊन त्यांचे सरकार कोसळण्याची ताकद निर्माण केली पाहिजे, असा सूर यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान आंदोलनाच्या शेवटी भीमसैनिक व पोलिसांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला; मात्र तो लगेच मिटविण्यात आला. यावेळी राजगड पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी रिपाइंचे प्रदीप कांबळे, प्रवीण ओव्हाळ, सुनील गायकवाड, महेंद्र साळुंखे, कुंदन गंगावणे, विनोद गायकवाड, किशोर अमोलिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र कोंडे, नाना धोंडे आदींसह असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.