पीएमपीएमएल कर्मचार्‍यांचा प्रामाणिकपणा , प्रवाशाची विसरलेली बॅग केली परत | पुढारी

पीएमपीएमएल कर्मचार्‍यांचा प्रामाणिकपणा , प्रवाशाची विसरलेली बॅग केली परत

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी बीआरटी बसस्थानकात भोसरी ते सांगवी या बसमध्ये प्रवाशाची विसरलेली बॅग वाहक सोमनाथ मुळे व चालक गणेश नलावडे यांनी प्रवाशाकडे सुपूर्द केली. वाहक व चालक यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
एकीकडे चोरीचे आणि फसवणुकीचे प्रकार वाढत असतानाच असा प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा शिल्लक असल्याचे दिसत आहे. बसमध्ये एका प्रवाशाची विसरलेली बॅग प्रवाशाला भोसरी बीआरटी स्थानकात परत देण्यात आली.

भोसरी ते सांगवीदरम्यान धावणारी बसमध्ये महिला प्रवासी सुषमा उत्तमराव शिंदे, रा. क्रांती चौक, औरंगाबाद या प्रवास करीत होत्या. बस दुपारी बारा वाजता सांगवीहून भोसरीमध्ये आली असता बसमध्ये विसरलेली प्रवाशाची बॅगवाहक व चालक यांचा नजरेस पडली. बसचालक गणेश नलावडे व वाहक सोमनाथ मुळे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी भोसरी बीआरटी स्थानक प्रमुख कंट्रोलर कम चेकर काळुराम लांडगे व विजय आसादे यांच्याकडे जमा केली.

काही वेळाने दोन महिला प्रवासी भोसरी बीआरटी स्थानकात बसमध्ये विसरलेली बॅगची चौकशी करू लागले. विसरलेल्या बॅगमध्ये मोबईल व रोख रक्कम, महत्त्वाचे कागदपत्रे होती. बस स्थानक प्रमुख लांडगे यांनी महिलेची ओळख पटवून व शहानिशा करून ती बॅग त्या महिलेला सुपूर्द केली. वाहक व चालक यांच्या सतर्कतेने बॅग परत मिळाल्याने त्या महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त करीत वाहक व चालक यांचे आभार मानले.

Back to top button