नाणे : महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला | पुढारी

नाणे : महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला

नाणे : महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले असून, कोरोनानंतर विस्कटलेली आर्थिक घडी अद्याप जुळत नसल्यामुळे
नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ

दोन वर्षे कोरोनामुळे टाळेबंदी करण्यात आली होती. त्यानंतर अनलॉकनंतर आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावल्यामुळे नागिरकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

गृहिणींचे नियोजन कोलमडले

गॅस सिलिंडरची किंमत 1000 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. तसेच, विविध डाळी, कडधान्य आणि किराणा मालाच्या वस्तूंवर जीएसटी लागल्यामुळे यांच्या किमतीत किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम घरखर्चावर झाला आहे; तसेच महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

तुटपुंज्या पगारावर गुजराण

ज्या प्रमाणात महागाई वाढत आहे, त्या तुलनेत वेतनमध्ये वाढ झाली नाही. उत्पन्नाचे प्रमाण कमी असल्यामुळे घरखर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य माणसांना आर्थिक गणितांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ आले आहे. घरखर्चावर मर्यादा आल्या आहेत. नाणे मावळात शेती हा व्यवसाय आहे. या परिसरात उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे नोकरीसाठी तळेगाव, पुणे, लोणावळा, पिंपरी चिंचवड इत्यादी ठिकाणी तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. वाढती महागाई व मिळणार्‍या तुटपुंज्या पगार याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहे.

बाजारपेठेतील वर्दळ झाली कमी

वाढत्या महागाईचा परिणाम फक्त लोकांवर झाला नसून, व्यापारी वर्गावर झाला आहे. ग्रामीण भागाला जोडणारी कामशेत बाजारपेठेत सततची वर्दळ असते; पण आता ही बाजारपेठ शांत आहे त्यामुळे व्यापार्‍यांना ग्राहकांची वाट पहात बसावे लागते. ग्राहक नसल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे.

Back to top button