मंचरचा वीजपुरवठा सहा तास खंडित | पुढारी

मंचरचा वीजपुरवठा सहा तास खंडित

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी मणिपूर येथील वीजवाहक तारा बदलण्याच्या कामामुळे शनिवारी (दि. 10) दुपारी बारा ते सायंकाळी सहा असा सुमारे सहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तारा जीर्ण झाल्यामुळे केव्हाही मंचर शहराचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने नवीन तारा टाकणे गरजेचे आहे. मणिपूर येथे दोन शेतकर्‍यांच्या ऊसपिकावरून तारा गेल्या आहेत.

शुक्रवारी दुपारी शॉर्टसर्किट झाल्याने संबंधित दोन शेतकर्‍यांचा ऊस जळाला. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी वीजवाहक तारा जोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना माघारी पाठविले. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करीत मंचरचा वीजपुरवठा पूर्ववत केला. शनिवारी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि पोलिसांची बैठक होऊन शुक्रवारी तुटलेल्या तारा पूर्ववत जोडण्यासाठी सहकार्य करण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी दुपारी वीजपुरवठा खंडित करून तारा जोडल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुरवठा पूर्ववत झाला.

Back to top button