ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; आंबेगाव तालुक्यात वॉर्डनिहाय बैठका सुरू | पुढारी

ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; आंबेगाव तालुक्यात वॉर्डनिहाय बैठका सुरू

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यात 21 ग्रामपंचायतीपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यामुळे ग्रामीण भागात राजकीय वातावरण थंडीच्या काळात चांगलेच ढवळून निघाले आहे. वॉर्डनिहाय उमेदवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट बनवून प्रचारास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. आंबेगाव तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 21 ग्रामपंचायतीपैकी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असलेल्या नागापूर, डिंभे खुर्द, तळेघर, चिखली व काही जागा रिक्त असल्याने आहुपे अशा 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, उर्वरित 16 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

यंदा राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप-शिंदे गटाने जनतेतून सरपंचपद असणार असल्याचे घोषित केल्याने राजकीय पक्षांची मोठी कसोटी लागणार आहे. जनतेतून सरपंचपद असल्याने आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस पक्ष सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. एखाद्या कार्यकर्त्याला किंवा अन्य मतदाराला रामराम न करणारा उमेदवार आता रामराम करू लागला आहे.

गावोगाव विविध पक्षांच्या माध्यमातून घोंगडी बैठका घेण्यासाठी वॉर्डनिहाय बैठका घेण्यासाठी गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते ऐन थंडीच्या काळातही रात्रीच्या वेळी बाहेर पडू लागल्याचे दिसत आहे. उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार यादी गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत, यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत उमेदवारी अर्ज भरले आहेत. गावातील भावकीच्या बैठका मतदानासाठी घेण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

जि. प., पं. स. निवडणुकीची रंगीत तालीम
ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर लगेचच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि इतर संस्थाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा परिणाम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर होऊ शकतो. यामुळे गावातील पदाधिकार्‍यांनी कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत ताब्यात घ्यायचीच हा चंग बांधला आहे. प्रामुख्याने मोठी महसूल असणारी घोडेगाव, कळंब, चांडोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यामुळे गुलाबी थंडीतही राजकीय वातावरण चांगले तापायला सुरुवात झाली आहे.

Back to top button