कर्मचार्‍यांअभावी ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचण : बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील प्रकार | पुढारी

कर्मचार्‍यांअभावी ग्राहकांना सेवा मिळण्यात अडचण : बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील प्रकार

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : आणे पठार (ता. जुन्नर) भागातील दहा गावांच्या ग्रामस्थांना आणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेतील अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे म्हणावी तशी सेवा मिळत नाही. यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. आणे पठार भागातील दहा गावांच्या ग्रामस्थांसाठी अर्थपुरवठा करणारी राष्ट्रीयीकृत बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव बँक शाखा आहे. परिणामी तेथे परिसरातील ग्राहकांची दररोज गर्दी होते. या बँकेत अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे गेल्या काही महिन्यापासून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सेवा मिळत नाही. बँक व्यवस्थापन उडवा-उडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांना परत पाठवतात, अशी तक्रार अनेक ग्राहकांसह कापड व्यापारी राजेंद्र नांगरे यांनी केली.

आणे येथे बँकेजवळ उपस्थित रंगदास स्वामी देवस्थानचे उपाध्यक्ष अनिल आहेर, बाळासाहेब थोरात, संजय पंडित, सचिन आहेर, राजेश दाते, सुनील दाते, मारुती शिंदे, अमोल शिंदे, राजू गांडाळ, बाळासाहेब नांगरे यांच्यासह अनेक ग्राहकांनी कोणत्याही प्रकारची सेवा बँकेत मिळत नाही, बँकेत रोखपाल नसल्याने पैसे काढण्यासाठी येणार्‍या ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. बँकेत केलेल्या व्यवहाराची बँक खातेपुस्तकात नोंद करण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. बँकेत पैसे काढण्यासाठी सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या गरजवंत ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागते असे सांगत रोष व्यक्त केला.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने आणे येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थापक चंद्रभान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील खातेपुस्तक छपाई मशीन बंद आहे, कर्मचारी संख्या अपुरी आहे, येथील गैरसोयीबाबत वरिष्ठांकडे अनेक वेळा तक्रार केली; मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ग्राहकांना असुविधा मिळत असल्याच्या प्रकाराला पुष्टी दिली.

Back to top button