प्रशासकीय अधिकारी कांतीलाल उमापांचे कार्य आदर्शवत : दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार | पुढारी

प्रशासकीय अधिकारी कांतीलाल उमापांचे कार्य आदर्शवत : दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : प्रशासनामध्ये उच्च पदावर काम केलेले कांतीलाल उमाप हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. या कुटुंबातील नम्रता, प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची तयारी वाखाणण्याजोगी आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून उमाप यांचे कार्य आदर्शवत असून उच्च पदावर काम करतानादेखील त्यांनी गाव व कुटुंब यासाठी निष्ठेने काम केल्याचे गौरव उद्गार माजी गृहमंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी काढले. राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या सेवानिवृत्ती सन्मान कार्यक्रमा निमित्त ते जातेगाव बुद्रुक(ता. शिरूर) येथे बोलत होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, उत्पादन शुल्कचे प्रवीण तांबे, कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, माजी सभापाती प्रकाश पवार, बालाजी प्रतिष्ठानचे सदाशिवअण्णा पवार, माजी सभापती सुभाष उमाप, पंढरीनाथ पठारे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुंगधराव उमाप, नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जि. प. सदस्य सविता बगाटे, माजी उपासभापती सविता पर्‍हाड, सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारी सेवेत उच्च पदावर गेल्यानंतर कुटुंबाकडे व गावाकडे पाहण्याच्या वृत्तीचा अभाव अनेक अधिकार्‍यांमध्ये दिसून येतो. ज्या भूमीत जन्मलो आहोत त्या ठिकाणी योगदान असले पाहिजे ही भूमिका ठेवून उमाप यांनी आपल्या भागासाठी काम केले आहे. उमाप यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले इंजिनिअरिंग कॉलेज अवसरी (ता. आंबेगाव) येथे करण्यासाठी आग्रह धरला व चिकाटीने त्यांनी ते मंजूर करून घेतले.

शिरूर-आंबेगाव मध्ये तीन ग्रामीण रुग्णालय कागदपत्रांची पूर्तता करून मंजूर करून घेतली.बैलगाडा शर्यत नव्याने पुन्हा सुरू होण्यासाठी राज्य शासनाने सादर करायच्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. शिरूर तालुक्यामधून अनेक मोठे अधिकारी प्रशासकीय पदावर काम करत आहे. शिरूर तालुका जसा पाण्यामुळे बागायती संपन्न झालेला आहे तसाच ज्ञानाच्या क्षेत्रात देखील शिरूर तालुका बागायती झाला आहे असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार म्हणाले की, सेवाभाव कधी निवृत्त होत नसतो उमाप हे त्याचे उदाहरण ठरतील. उमाप यांचे निवृत्तीपर भाषण हे पुस्तक रूपात तयार करावे सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी ते मार्गदर्शक ठरेल.

सत्काराला उत्तर देताना कांतीलाल उमाप म्हणाले की आजोबा आई-वडिलांच्या संस्काराने मला घडविले. त्यांच्याकडून प्रामाणिकता नम्रपणा आदरभाव व कष्टाची प्रेरणा मिळाली याचा उपयोग प्रशासकीय सेवेमध्ये झाला. कागदातला माणूस वाचायला शिकलो माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शरद पवार, वसंत दादा पाटील यांच्या विचाराच्या प्रेरणेतून काम करता आले.

वळसे पाटील यांच्या समवेत काम करत असताना प्रशासकीय अधिकारी म्हणून घडत गेलो. कष्टाच्या व चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक ते आयुक्त पर्यंत काम करता आले. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, विलास लांडे, पोपटराव गावडे, सूर्यकांत पलंडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

Back to top button