राहू : सत्तेच्या मस्तीनेच भाजप नेते बरळत आहेत : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

राहू : सत्तेच्या मस्तीनेच भाजप नेते बरळत आहेत : विरोधी पक्षनेते अजित पवार

राहू; पुढारी वृत्तसेवा : सत्तेची मस्ती आल्यामुळे भाजपचे काही लोक सातत्याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी गरळ ओकत आहेत. महापुरुषांची बदनामी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. दौंड तालुक्यातील मिरवडी येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, उद्योजक एल. बी. कुंजीर, योगिनी दिवेकर, सुशांत दरेकर, नितीन दोरगे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडताना अजित पवार म्हणाले की, स्वतःमध्ये कर्तृत्व असेल तर ज्योतिषाकडे जायची गरज भासत नाही. ज्योतिषाला हात दाखवून तुम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहात. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. मुख्यमंत्री शिंदे यांना आपण मुख्यमंत्री आहोत यावर भरवसा नाही. ते अजूनही भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख करत आहेत. गुवाहाटीला जाऊन नवस केला आणि तो नवस फेडायला पुन्हा गुवाहाटीलाही गेले, हे पुरोगामी महाराष्ट्राचे विचार नसल्याचे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले.

राज्यामध्ये सरकार बदलल्यामुळे सरकारमधील नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. रोज कोण ना कोण बरळत आहे. अब्दुल सत्तार महिलांचा अपमान करतात, तर पुण्याचे पालकमंत्री फुले, आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असे म्हणतात. सुसंस्कृत पुण्यासारख्या जिल्ह्याला गालबोट लावण्याचे काम पालकमंत्री पाटील यांनी केले असून, तुम्ही तुमची बदनामी करता आणि आमचीपण बदनामी करता. तुम्ही ही भाषा वापरणे बरे नाही, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

राज्यपाल कोश्यारी यांचे वय झाले असून, तेसुद्धा काहीही बरळत असतात. भाजपचा एक नेता म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि पुन्हा त्यावर सारवासारव करायचे प्रकार सुरू आहेत. गोपीचंद पडळकरला तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला की, अफजल खानाने शिवाजी महाराजांचा हेच माहीत नाही. गोपीचंदचे बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त केले तरीही भाजपने त्याला पुन्हा आमदार केले. आता आमदार म्हणून नीट काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सुनावले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सागर शेलार यांनी केले, तर आभार उपसरपंच शांताराम थोरात यांनी मानले.

केंद्र सरकार शेतकरीविरोधी
हे सरकार शेतकरीविरोधी असून, सध्या साखरेचा वापर स्टॉक केला असून, नियमानुसार त्यालाही परवानगी मिळत नाही तर कांदा आणि टोमॅटोचे दरही प्रचंड प्रमाणात उतरले आहेत. दुसरीकडे निवडणूक झाली की पुन्हा एकदा खत, पेट्रोल, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढतात, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला.

भाजपचा महाराष्ट्र विभाजनाचा डाव
नांदेड, देगलूर येथील काही गावे तेलंगणाला तर अक्कलकोट येथील काही गावे कर्नाटकाला, सुरगाणा, नाशिकमधील गावे गुजरातला जाण्यासाठी प्रयत्न करत होती, त्याकरिता आम्ही लक्ष दिले; मात्र सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई काही ऐकत नसून महाराष्ट्र सीमावादाला भाजपनेच बळ दिले असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापन केला होता, याचा सध्या विसर पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button