शिक्षणाच्या ओढीने ’तो’ दररोज करतोय 28 किलोमीटरची पायपीट

शिक्षणाच्या ओढीने ’तो’ दररोज करतोय 28 किलोमीटरची पायपीट

भास्कर सोनवणे : 

पिंपरी : विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्याशेजारील स्मार्ट सिटीमध्ये आजही शिक्षण घेण्यासाठी दोघा भावंडांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे तसेच गैरसुविधेमुळे त्या दोघांना धावत-पळत शाळा गाठावी लागते.

रावेत, किवळे परिसरातील मुकाई चौक परिसरात राहणारा, सहावीमध्ये शिकणारा आलोक गोडसे हा विद्यार्थी आपल्या लहान भावाच्या आणि स्वत:च्या शिक्षणासाठी दररोज सुमारे 28 किलोमीटर अंतर ये-जा करतो. आलोक आपला लहान भाऊ अरव याला सोडण्यासाठी दररोज 14 किलोमीटरची पायपीट करून पुन्हा स्वत: 14 किलोमीटरची पायपीट करत शाळा गाठत आहे. असे दररोज शाळेत जाण्यासाठी 28 किलोमीटरची पायपीट तो करत असल्याचे स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील एक विदारक सत्य समोर आले आहे.

घरची परिस्थिती जेमतेम

एवढे अंतर चालायला दुसरीतल्या अरवचे पाय दुखले नाहीत का?, असे विचारल्यावर आलोक म्हणाला, की 'कधी त्याला कडेवर तर कधी पळवत' असं घेऊन जातो. आलोकची घरची परिस्थिती जेमतेम आहे. आई धुणी-भांडी करते. मुकाई चौकातून सकाळी आठच्याआधी बस नसल्याने मुलांना चालत शाळेत जावे लागते. अरव हा दुसरीत असून, आकुर्डी येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर, आलोक सहावीत आहे.

आलोकचा दिनक्रम नित्याचा आहे. लहान भावाला सोडून आल्यानंतर त्याला परत दुपारची शाळा असल्याने पुन्हा तो पायपीट करत शाळेत जातो व येतो. लहान भाऊ 14 किलोमीटरची, तर मोठा भाऊ दिवसभरात 28 किलोमीटरची पायपीट करत असल्याचे सांगताच आजूबाजूची लोकं थक्क झाली. त्यांचा हा थक्क करणारा प्रवासाचा विचार केल्यास सागर व अरवसारखे अनेक विद्यार्थी बसअभावी पायपीट करत असल्याचे दिसून आले. मुकाई चौक येथून सकाळी सुटणार्‍या बसेसच्या वेळा योग्य नसल्यामुळे या दोघांना शाळेसाठी पायपीट करावी लागते. शाळा व बसची वेळ जुळत नसल्याने त्यांना चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. स्मार्ट सिटीत ही परिस्थिती असल्याने आश्चर्याची गोष्ट आहे.

सात किलोमीटर अंतर पार करण्यास सव्वातास…

मुकाई चौकापासून आमच्या शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बसचे वेळापत्रकामध्ये बदल करण्यासाठी शाळेचे पत्र आगार प्रमुखांना देण्यात येईल. पालकांनीही यासाठी पुढे यावे.
                                                                 -योगिता भेगडे, मुख्याध्यापक

वेळापत्रकात बदल करण्याचा अधिकार स्वारगेट मुख्यालयाला आहे. मागणीनुसार बदल करण्यात येईल. पालकांनी जरी सह्यांचे पत्र दिल्यास बसची वेळ बदलून मिळेल.
                                                      -शांताराम वाघिरे, आगारप्रमुख, पीएमपी

लहान भावाला सोडण्यासाठी दररोज सकाळी 6 वाजता घरातून निघतो. कारण शाळेची वेळ सकाळी 7.10 ची असते. सकाळी पीएमपी बस नसल्याने मुकाई चौक ते आकुर्डी प्राधिकरण येथे शाळेत जातो. तसेच भावाची शाळा 11.50 ली सुटते. शाळा सुटण्याचा आणि बसची वेळ एकच असल्याने बस चुकते. त्यामुळे पुन्हा पायपीट करून घर गाठावे लागते.
                                                              -आलोक गोडसे, विद्यार्थी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news