क्रेनने चिरडल्याने चिमुरड्याचा मृत्यू; जंक्शन-कळस रस्त्यावर अपघात | पुढारी

क्रेनने चिरडल्याने चिमुरड्याचा मृत्यू; जंक्शन-कळस रस्त्यावर अपघात

जंक्शन; पुढारी वृत्तसेवा : जंक्शन (ता. इंदापूर) येथे कळस-जंक्शन रस्त्यावर आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर क्रेनने चिरडल्याने 9 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) घडली. अर्जुन जयवंत गावडे (वय 9, रा. कळस) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्याचे नाव आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. कामासाठी जड वाहने रस्त्याने ये-जा करीत आहेत.

शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास जयवंत भाऊसाहेब गावडे (रा. कळस) हे कुटुंबाबरोबर दुचाकीवर जंक्शनजवळील मंगल कार्यालयामध्ये पाहुण्याच्या लग्नसोहळ्यासाठी आले होते. कार्यालयासमोरच्या रस्त्याच्या बाजूला दुचाकीवरून मुलाला व पत्नीला उतरविले. या वेळी 9 वर्षांचा मुलगा अर्जुन रस्त्याच्या बाजूला थांबला असताना कळस बाजूकडून वेगाने आलेल्या हायड्रोलिक क्रेनने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या मुलाला चिरडले. या अपघामध्ये चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला.

आई-वडिलांसमोरच मुलाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी जयवंत भाऊसाहेब गावडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी जानआलम निजामुद्दीन शेख मनसुरी (रा. उत्तर प्रदेश) या क्रेनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या हायड्रोलिक क्रेनवर आर. एस. कामथे असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button