पिरंगुट : मुठा घाटात एसटीचे ब्रेक फेल | पुढारी

पिरंगुट : मुठा घाटात एसटीचे ब्रेक फेल

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा : लवासा-पुणे एसटी बस (एमएच 07 सी 7540) शनिवारी (दि. 10) पुण्याकडे येत असताना तिचा मुठा घाटामध्ये ब्रेक फेल झाला. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानतेने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुठा घाटातून पुण्याकडे येताना डाव्या बाजूला प्रचंड खोल दरी असून, अनेक ठिकाणी कठडे नाही. त्यामुळे जर चुकून बस दरीमध्ये कोसळली असती, तर आज मोठा अनर्थ झाला असता. परंतु, तो सुदैवाने टळला.

याबाबतची माहिती अशी, की लवासा-पुणे ही बस शनिवारी पुण्याच्या बाजूला येत होती. या वेळी मुठा खिंडीतून थोडे अंतर पार केल्यानंतर या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालक दगडू निवृत्ती घोडके यांच्या लक्षात आले. त्यांनी अतिशय शिताफीने घाट संपल्यानंतर लागणार्‍या उरावडे गावामध्ये असलेल्या मारणे पेट्रोलपंपाच्या दगडी कठड्याला ठोस देऊन ही बस थांबवली. सर्व प्रवाशांनी, तसेच ग्रामस्थांनी चालक घोडके यांचे आभार मानले आणि कौतुक केले.

दोन दिवसांपूर्वीच मुठा गावची यात्रा झाली होती. त्यामुळे तिकडून येणार्‍या प्रवाशांची संख्या सध्या जास्त आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याचे कळताच बसमधील प्रवासी भेदरले होते. परंतु, महिला वाहक एस. एस. पवार यांनी सर्वांना धीर देत काहीही होणार नाही, असे सांगितले. मुळशी तालुक्यामध्ये सर्वाधिक घाट रस्ते आहेत. त्यामुळे तालुक्यामध्ये गाड्या पाठवताना एसटी महामंडळाने जरा सुस्थितीत असलेल्या किंवा नवीन गाड्या पाठवाव्यात, अशी मागणी जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय सातपुते यांनी केली.

Back to top button