मांडवगण फराटा : शेतमजूर महिलेचा खून; मृतदेह नदीत फेकला | पुढारी

मांडवगण फराटा : शेतमजूर महिलेचा खून; मृतदेह नदीत फेकला

मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : संगीता रमेश आडके (वय 48, रा. बाभूळसर बुद्रुक) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा महेंद्र आडके याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिरूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला ही शुक्रवारी (दि. 9) शेळ्या चारण्यासाठी गेली होती.

परंतु, रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. रात्री उशिरा संबंधित महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. या वेळी ग्रामस्थांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर मांडवगण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. उत्तरीय तपासणीसाठी पुढे पाठविण्यात आला.

शनिवारी (दि. 10) शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुन्हा खुनाचे धागेदोरे मिळविण्यासाठी शोधाशोध सुरू केली. शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह पोलिस अंमलदारांनी तपासाची दिशा ठरवत दिवसभर तपास सुरू ठेवला. श्वान पथक आल्यानंतर श्वानाने परिसरात माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनेतील विविध वस्तू ताब्यात घेण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, पोस्ट मार्टेमनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर आदींनी तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, सहायक फौजदार राजेंद्र साबळे आदींनी घटनास्थळी पुरावे शोधण्यासाठी परिश्रम घेतले.

तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहेत. घटनेनंतर जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे यांनी पोलिसांनी आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली. मयत महिलेचे पती यांनीही आरोपीला लवकरात लवकर अटक करून शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.

Back to top button