कचर्‍याच्या दुर्गंधीने ओतूरकर त्रस्त | पुढारी

कचर्‍याच्या दुर्गंधीने ओतूरकर त्रस्त

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : ओतूर(ता. जुन्नर)चा कचरा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कचरा डेपो अयोग्य ठिकाणी असल्याने स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. अज्ञात व्यक्तीने कचर्‍याच्या ढिगाला आग लावल्यामुळे कचरा ढीग काही दिवसांपासून धुमसतो आहे. कचर्‍याची दुर्गंधी व धूर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ओतूरची लोकसंख्या 25 हजाराहून अधिक आहे. दैनंदिन गोळा होणारा कचरा अवचट सभागृहाच्या मागील बाजूला टाकला जातो. अवचट सभागृहाच्या पटांगणात विविध खेळांची मैदाने लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहेत.

तसेच व्यायाम शाळा आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दररोज सकाळी व सायंकाळी अनेक नागरिक, युवक, वृद्ध येथे व्यायामासाठी येतात. त्याशिवाय बाजूलाच शिवशंकराचे मंदिर व स्मशानभूमी आहे. परिसरात पोलिस ठाणे, कृषी कार्यालय, वन विभाग, विद्यालय आणि मानवी वस्ती आहे. अशा ठिकाणी हा कचरा डेपो असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कोणीतरी कचरा पेटविल्याने धुराच्या त्रासाची भर पडली आहे. या प्रश्नावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कचरा प्रश्नी ओतूर ग्रामपंचायत प्रशासनाने दोनदा विशेष बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, कचरा प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला आहे. याबाबत ग्रामसेवक वनघरे यांच्याशी संपर्क साधला असता, कचरा डेपोविषयी जागेचा शोध सुरू आहे. योग्य जागेवर कचरा डेपो सुरू करून त्यावर विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. प्रकल्प उभारणीस वेळ लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Back to top button