पुणे मेट्रो स्थानकांमध्ये शंभरावा एस्कलेटर | पुढारी

पुणे मेट्रो स्थानकांमध्ये शंभरावा एस्कलेटर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील मेट्रोचे काम वेगाने पूर्णत्वाकडे जात असून, मेट्रो स्थानकांवर प्रवाशांच्या सोईसाठी लिफ्ट तसेच एस्कलेटर (सरकते जिने) बसविण्याचे आणि जिने बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. दापोडी स्थानकावर शुक्रवारी शंभरावे एस्कलेटर बसविण्यात आले. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड महापालिका भवन (17 कि.मी.) आणि पौड रस्त्यावरील वनाज ते रामवाडी (16 किमी) हे 33 कि.मी. लांबीचे दोन मेट्रो मार्ग आहेत. त्यापैकी प्राधान्याने पूर्ण केलेल्या दोन मार्गांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्चला मेट्रो सुरू करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानकापासून फुगेवाडी (7 कि.मी.) आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय (5 कि.मी.) हे मार्ग सुरू झाले. त्याचा विस्तार जानेवारीत होणार असून, त्या विस्तारित मार्गावरील मेट्रोची चाचणी नुकतीच घेण्यात आली. पुणे मेट्रोचे 85 टक्के काम झाले असून, उर्वरित काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. प्रवाशांच्या वाढीचा विचार करून पुणे मेट्रोची स्थानके अद्ययावत करण्यात येत असून, त्यात लिफ्ट, एस्कलेटर बसविण्यात येत आहेत. लिफ्ट व एस्कलेटरमुळे दिव्यांगजन व ज्येष्ठ नागरिक कोणाच्याही मदतीशिवाय मेट्रो स्थानकावर जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात.

पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर एकूण 166 एस्कलेटर बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी शंभरावे एस्कलेटर आज बसविण्यात आले. हा एस्कलेटर शिंडलर कंपनीच्या पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात आला आहे. उर्वरित एस्कलेटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. पुणे मेट्रो प्रकल्पात एकूण 137 लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यापैकी 71 लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. 8 लिफ्ट बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. उर्वरित लिफ्ट टप्प्याटप्प्याने बसविण्यात येतील.

Back to top button