व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला तरुणीचा अश्लील फोटो | पुढारी

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवला तरुणीचा अश्लील फोटो

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तरुणीचा अश्लील फोटो ठेवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी देवेंद्र धरमचंद फुलफगर (रा. शिरूर) याला अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी गुरुवारी फुलफगरच्या शिरूरमधून मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना 1 डिसेंबर रोजी घडली आहे. याबाबत कोंढवा परिसरातील एका 32 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आरोपीने फिर्यादीचा खासगी क्षणातील फोटो त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवून ’ये तो शुरुआत है’ असे लिहिले होते. हा प्रकार तरुणीच्या निदर्शनास येताच तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने तरुणीवर दबाव टाकल्याचेदेखील फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Back to top button