पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात साकारण्यात येत असलेल्या कलाग्राम प्रकल्पाची विविध कामे करण्यासाठी 4 कोटींचा निधी 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातून 72 ब नुसार दिला जाणार आहे. यासंदर्भातील आर्थिक दायित्वाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
सिंहगड रस्त्यावरील पानमळ्याजवळ उद्यान साकारण्याचा ठराव महापालिकेचे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अरुण धिमधिमे यांनी 2002 मध्ये मांडून तो मंजूर करून घेतला. त्यानुसार येथील 27 एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये जपानी शैलीचे आणि मुघल शैलीचे गार्डन आणि ग्रामीण कलाकृती व लोककला मांडणारे कलाग्राम साकारण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार 10 एकर जागेत जपानी शैलीचे गार्डन आणि 6 एकर जागेत मुगल शैलीचे गार्डन आहे.
उर्वरित 2 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय आणि 3 एकर जागेवर कलाग्राम प्रकल्प साकारण्यात येत आहे. तर उर्वरित जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. अनेक वर्षे रखडलेले कलाग्रामचे काम सध्या सुरू असून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 95 टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी महापालिका, राज्य शासन आणि स्थानिक आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
येथील पार्किंग, अॅम्फीथिएटर, फूड कोर्ट, बैठक व्यवस्था, अंतर्गत रस्ते, सीमा भिंत आदी कामे करण्यासाठी आणखी 12 कोटी रुपये लागणार असल्याचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामासाठी 2023-24 या अंदाजपत्रकात 8 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कलाग्राममध्ये काय असेल?
कलाग्रामचा परिसर आणि बांधकाम एखाद्या गावातील वास्तूप्रमाणे साकारण्यात आले आहे. या ठिकाणी 30 गाळे असून, त्यात एक ओपन अॅम्पी थिएटर, विविध राज्यांच्या वस्तूंच्या विक्रीचे काऊंटर, दोन लायब्ररी, विविध राज्यांमधील खाद्यपदार्थ विक्री करणारे 12 स्टॉल, विविध प्रकारच्या कार्यशाळांसाठी दोन खुल्या व्यासपीठांचा समावेश आहे. या ठिकाणी बांबू व दगडांपासून तयार होणार्या विविध वस्तू व हस्तकलांची प्रात्यक्षिके पाहता येणार आहेत.