नारायणगाव : चार शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू, आदिवासी कुटुंबावर आघात

नारायणगाव : चार शेळ्यांचा संशयास्पद मृत्यू, आदिवासी कुटुंबावर आघात

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: हिवरे (ता. जुन्नर) गावाजवळील कैलासनगर येथे शुक्रवारी (दि. ९) सकाळी संशयास्पदरित्या चार शेळ्या मृत्युमुखी पडल्या. यामध्ये दोन गाभण शेळ्या, एक पाठ व एक बोकड यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मोलमजुरी करून उपजिविका करणाऱ्या आदिवासी कुटुंबावर मोठा आघात झाला असून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ओझर येथील हिवरे जवळील कैलासनगर या ठिकाणी नवनाथ चकवे हे आदिवासी कुटुंब पत्नी व मुलांबाळांसह मोलमजुरी व खंडाने जमिनी करून उपजिविका करत आहेत. त्यांनी दोन पैसे हाताला लागतील म्हणून ५ शेळ्या पाळल्या होत्या. या पैकी दोन शेळ्या, एक बोकड व एक पाठ अचानकपणे शुक्रवारी सकाळी मृत झाल्याचे दिसून आले. ही बाब चकवे यांनी स्थानिक नागरिक व पोलिस पाटील यांच्या लक्षात आणून दिली असता ओतूरचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या ठिकाणी पंचनामा करून त्या विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळवले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लहाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत शेळ्या ताब्यात घेऊन त्यांचे शव-विच्छेदन करून विसेरा पुणे या ठिकाणी पाठवला आहे.

दरम्यान या शेळ्यांचा मृत्यू हा घातपातातून झाल्याचा संशय चकवे व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर काही संशयास्पद आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालामध्ये या शेळ्यांचा मृत्यू श्वसननलिका व फुफ्फुस निकामी झाल्यामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा प्रकार प्राण्यांना होणाऱ्या घटसर्प यासारख्या आजारांमध्ये आढळून येतो. या चारही शेळ्यांचा विसरा पुणे या ठिकाणी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यावर नेमकं कारण स्पष्ट होईल.

– डॉ. अनिल लहाणे, पशुवैद्यकीय अधिकारी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news