‘जी-20’ माध्यमातून जागतिक सहकार्यासाठी भारत सज्ज : भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे | पुढारी

‘जी-20’ माध्यमातून जागतिक सहकार्यासाठी भारत सज्ज : भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेचे अध्यक्षपद एक डिसेंबरपासून भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल, असा विश्वास भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ते म्हणाले, वर्षभर देशातील 56 ठिकाणी विविध विषयांवरील परिषदा होतील.

त्यामध्ये महाराष्ट्रातील पुण्यासह चार शहरांचा समावेश झालेला आहे. शिखर परिषद सप्टेंबरमध्ये होणार असून, त्यामध्ये 43 देश सहभागी होतील. सहस्त्रबुद्धे म्हणाले, हवामान बदल, कोविड महामारी, रशिया-युक्रेन युद्धामुळे पसरलेली अस्थिरता यांमुळे जगभरात गोंधळाची स्थिती आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्यामुळे जगातील गरिबांचे जगणे बिकट झाले आहे. जागतिक स्तरावरील पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत.

ते म्हणाले, की इंडोनेशियातील बाली येथे पार पडलेल्या 17 व्या ‘जी-20’ परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर जागतिक शिक्कामोर्तब झाले. जगातील प्रभावशाली राष्ट्रांचे नेतृत्व करण्याची संधी आता भारताला मिळाली आहे. जग एकाच वेळी भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदी, ऊर्जेच्या वाढत्या किंमती, आणि साथीच्या रोगांचे दीर्घकालीन दुष्परिणाम अशा विविध संकटांशी झुंजत असताना जी-20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे.

नैसर्गिक स्त्रोतांवर सर्वांची समान मालकी आणि ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ या सूत्रानुसार, लोकशाहीची मातृभूमी असलेल्या भारताच्या ’वसुधैव कुटुम्बकम’ या सांस्कृतिक मूल्याची ओळख जगाला होईल. भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे, ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि जीवितसुरक्षा या त्रिसूत्रीच्या आधारे भारताच्या प्राचीन
परंपरेनुसार विश्वबंधुत्वाचे नवे पर्व पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जगात सुरू होईल, असा विश्वास सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला.

Back to top button