बारामतीतील फ्लेक्सवर कारवाई; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी लावलेले फ्लेक्स व अन्य फ्लेक्सही हटवले | पुढारी

बारामतीतील फ्लेक्सवर कारवाई; राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी लावलेले फ्लेक्स व अन्य फ्लेक्सही हटवले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाबत दैनिक पुढारीत गुरुवारी (दि. 8) वृत्त प्रसिद्ध होताच नगरपरिषदेला खडबडून जाग आली आहे. वृत्त प्रसिद्ध झाल्यावर लगेच नगरपालिकेकडून शहरातील फ्लेक्स उतरविण्यात आले. राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी लावलेल्या फ्लेक्ससह अन्य फ्लेक्सही हटविण्यात आले. बारामती शहराला एकेकाळी फ्लेक्सने बकालपणा आला होता. त्यामुळे नगरपरिषदेने फ्लेक्स लावण्यासाठी परवानगीसह शुल्क निश्चित केले. त्यानंतर हे प्रमाण कमी झाले होते.

परंतु पालिकेकडून परवानगी व शुल्काची आकारणी होत नाही असे दिसताच पुन्हा फ्लेक्सबाजी होऊ लागली होती. दै. पुढारीने गुरुवारी यासंबंधी सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी तत्काळ चौका-चौकात लावलेले फलक उतरवले. काहींनी स्वतःहून फ्लेक्स उतरवले. तर जे फलक उतरवले गेले नाहीत ते पालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकले. अतिक्रमण विभागही याबाबत लक्ष ठेवणार असून बेकायदा फलक लावल्यास तो जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे.

विनापरवाना फ्लेक्स लावणा-यांवर या पुढील काळात कारवाई करणार आहे.

                            महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपालिका.

Back to top button