कुरकुंभ : वापरून झालेल्या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न गंभीर | पुढारी

कुरकुंभ : वापरून झालेल्या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न गंभीर

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : वापरून झालेल्या प्लास्टिक पिशव्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रस्ते असो की राष्ट्रीय महामार्ग, ओढे- नाले किंवा मोकळ्या जागा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा कचरा आढळून येत आहे. राज्य सरकारचे निर्बंध झुगारून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात असल्याचे यातून दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाने ठरावीक जाडीच्या प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. तसे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची बाजारात खुलेआम विक्री होत आहे. दुकानदारांनी ग्राहकांना दिलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर झाल्यानंतर त्या कचर्‍यात फेकून दिल्या जात आहेत. कचरा कुंड्यांऐवजी बेशिस्तपणे वाटेल तिथे टाकला जात आहे. कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणाची समस्या आणखी गडद झाली आहे.

इतर कचर्‍यापेक्षा वापर झालेल्या प्लास्टिक पिशव्यांनी कचराकुंड्या तुडुंब भरत असल्याचे चित्र आहे. कचर्‍यातील वाढत्या प्लास्टिकमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही जनावरांच्या पोटात खाद्यातून हे प्लास्टिक गेल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रयत्न कमी पडत असल्याचे यातून दिसत आहे.

हॉटेल, भाजीपाला, हारफुले, फळविक्रेते, चिकन, मटण, हातगाडीवाले तसेच इतर दुकानदार बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करतात का हे तपासण्याची गरज आहे. अविघटनशील प्लास्टिकबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. परंतु, कारवाईच केली जात नसल्याने विक्रेते तसेच नागरिक निर्ढावले आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर घालणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button