मंचर; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदासह थेट सरपंचपदाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 16 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 38 उमेदवार रिंगणात आहेत, तर सदस्यपदासाठी एकूण 260 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली आहे.
आंबेगाव तालुक्यातील निवडणूक लागलेल्या 21 ग्रामपंचायतींपैकी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असलेल्या नागापूर, डिंभे खुर्द, तळेघर, चिखली व काही जागा रिक्त असल्याने आहुपे अशा 5 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. उर्वरित 16 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे.
यापैकी घोडेगाव, साल, आंबेदरा, आमोंडी, गंगापूर खुर्द, चिंचोडी, कळंब, पारगाव तर्फे खेड, मेंगडेवाडी, भावडी, नारोडी, रांजणी या 12 गावातील सरपंचपदासाठी प्रत्येकी 2 उमेदवार उभे आहेत. निघोटवाडी, चांडोली बुद्रुक, धामणी या तीन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रत्येकी 3 उमेदवार असून गोहे खुर्द सरपंचपदासाठी 5 उमेदवार असे एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत.
सदस्यपदासाठी निवडणूक
आहुपे 7 जागांपैकी 5 बिनविरोध, 2 रिक्त (बिनविरोध), तळेघर सर्व 7 जागा बिनविरोध, डिंभे खुर्द सर्व 7 जागा बिनविरोध, घोडेगाव 17 जागांसाठी 44 उमेदवार, साल 7 जागांसाठी 14 उमेदवार, आंबेदरा सर्व 7 जागा बिनविरोध, फक्त सरपंचपदासाठी निवडणूक, आमोंडी 9 जागांतील 4 बिनविरोध उर्वरित 5 जागांसाठी 11 उमेदवार, गंगापूर खुर्द 9 जागांपैकी 7 बिनविरोध उर्वरित 2 जागांसाठी 4 उमेदवार, चिंचोडी 13 जागांपैकी 1 बिनविरोध उर्वरित 12 जागांसाठी 23 उमेदवार, चांडोली बुद्रुक 11 जागांसाठी 30 उमेदवार, कळंब 13 जागांपैकी 3 बिनविरोध उर्वरित 10 जागांसाठी 23 उमेदवार, पारगाव तर्फे खेड 11 जागांसाठी 24 उमेदवार, मेंगडेवाडी 9 जागांसाठी 18 उमेदवार, धामणी 9 जागांपैकी 6 बिनविरोध उर्वरित 3 जागांसाठी 6 उमेदवार, भावडी 7 जागांपैकी 2 बिनविरोध उर्वरित 5 जागांसाठी 12 उमेदवार, नारोडी 11 जागांपैकी 2 बिनविरोध उर्वरित 9 जागांसाठी 17 उमेदवार, गोहे खुर्द 7 जागांपैकी 2 बिनविरोध उर्वरित 5 जागांसाठी 4 उमेदवार, निघोटवाडी 13 जागांसाठी 26 उमेदवार, रांजणी 11 जागांपैकी 10 बिनविरोध उर्वरित 1 जागेसाठी 3 उमेदवार, नागापूर सर्व 9 जागा बिनविरोध, चिखली एकूण 7 जागा बिनविरोध.
42, 251 मतदार बजावणार हक्क
एकूण 76 सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 151 जागांसाठी 259 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत एकूण मतदार केंद्रांची संख्या 61 असणार असून त्यात महिला मतदार 20 हजार 723, तर पुरुष मतदार 21 हजार 528 असे एकूण मतदार 42 हजार 251 आहेत. मतदान 18 डिसेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होणार आहे.