रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : केंद्र व महाराष्ट्र शासनाकडून कृषी सोलर पंप बसवण्यात येतात. मात्र या पंपांचे काम खासगी कंपन्या घेत आहेत. ते मनमानी पद्धतीने काम करत आहेत. शेतकर्यांकडून काही पैशांची मागणी करत आहेत, वीज बचत होण्यासाठी शासनाकडून शेती पंप सोलरवर चालावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र या योजनेचा ठेकेदारांनी बोजवारा उडवला आहे.
शासनाकडून दिल्या जाणार्या अटींचे पालन केले जात नाही. हलगर्जीपणाने कसेबसे सोलर पंप जोडले जात आहेत. त्याची फिटिंगही व्यवस्थित केली जात नाही. अशाच पद्धतीने शेतकर्यांना पंप सुरू करून दिले जात आहेत. जर एखाद्या शेतकर्याने तक्रार केली तर त्याचा पंप या कंपनीचे कामगार मुद्दाम उशिरा जोडतात. अशा पद्धतीने शेतकर्यांची फसवणूक केली जाता आहे.
खासगी सोलर कंपनी कर्मचारी सोलर कंपनीच्या एका कामगाराला विचारणा केली असता ते म्हणाले की, आमच्याकडे सोलर पंप फिटिंगसाठी लागणारे सिमेंट, वाळू, कच या गोष्टी कंपनी देत नाही. त्या शेतकर्यांना द्याव्या लागतात. काही अडचण असेल तर आमच्या वरिष्ठाशी बोलून घ्या, असे सांगण्यात आले आहे. शासनाकडून काही नियाम, अटी घालून ही योजना राबवत आहे. मात्र खासगी ठेकेदार त्यांच्या सोयीनुसार ही कामे करत आहेत. त्यांच्या कामांचा दर्जाही चांगल्या प्रतीचा नाही. यावर स्थानिक विद्युत कर्मचार्यांचे नियंत्रण असेल तर अशा प्रकाराला कोठेतरी आळा बसेल.
फिटिंगचे सामान खरेदी करण्याची सक्ती
काही खासगी कंपन्या सौर पंप फिटिंगसाठी लागणारे सामान खरेदी करायला सांगत आहेत. शासनाकडून कृषी सोलर योजना ही मोफत राबवली जाते. मात्र खासगी कंपन्या शेतकर्यांची लूट करत आहेत. अशा कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.